वसईत काँग्रेसला धक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

विरार ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच आज वसईतील काँग्रेसचे दिग्गज्ज आणि प्रदेश सचिव विजय पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

विरार ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच आज वसईतील काँग्रेसचे दिग्गज्ज आणि प्रदेश सचिव विजय पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे त्यांना शिवसेनेतून वसईमधून विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. 

वसई विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, म्हणून काही वर्षांपासून विजय पाटील प्रयत्नशील होते; परंतु काँग्रेस मात्र आमदार हितेंद्र ठाकूर आणि बविआबरोबर राहत असल्याने काँग्रेसमधून उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे लक्षात येताच अखेर पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर मनसेचे माजी तालुकाप्रमुख प्रफुल्ल ठाकूर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेल्या पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे वसईमध्ये मात्र शिवसेनेची उमेदवारी कोणाला, हा प्रश्‍न उभा राहिला आहे. शिवसेनेतर्फे आतापर्यंत माजी आमदार विवेक पंडित, सायमन मार्टिन यांची नावे चर्चेत असताना आता विजय पाटील यांचेही नाव पुढे आल्याने शिवसेनेतून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Vasai Congress Regional Secretary Vijay Patil enters Shiv Sena