पावसामुळे वसई किल्ल्याची पडझड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला, त्यातील इतिहास आणि प्रसिद्ध वास्तूंची दुरवस्था हा रोजचा चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळला आहे. 

विरार  ः ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला, त्यातील इतिहास आणि प्रसिद्ध वास्तूंची दुरवस्था हा रोजचा चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळला असून त्यामुळे इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

वाढत्या पावसामुळे किल्ल्यातील बहुतेक भागातील वास्तूंच्या भिंतीवर गच्च झाडी वाढलेली असून त्यातील काही वास्तू भुईसपाट होत आहेत. किल्ल्यातील काही मोजक्‍याच वास्तू पुरातत्व विभागाच्या प्रत्यक्ष लेखी नोंदणीत येत असल्याने गर्द झाडीत विखुरलेले दुर्लक्षित अवशेष संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच पावसामुळे ऐतिहासिक डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन किल्ल्याची योग्य दुरुस्ती न झाल्यास वास्तू मूळ स्वरूप हरवून बसेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

सध्या या वास्तूभोवती पुरातत्त्व विभागाने लोखंडी जाळी बसवलेली असली, तरी पर्यटकांवर कमानीचा मोठा भाग सहजपणे पडून दुर्घटना होण्याची दाट शक्‍यता आहे. नरवीर चिमाजी आप्पा स्मारकातून पुढे असणाऱ्या वळणावर या कमानीचा कोसळलेला भाग आणि विखुरलेल्या शिळा दिसत आहेत. . 

जंजिरे वसई किल्ल्यातील वास्तू, पोर्तुगीज ख्रिस्तमंदिरे, पेशवेकालीन मंदिरे, तटबंदी, विहिरी यांची सातत्याने होणारी दुरवस्था पाहता केंद्रीय पुरातत्त्व विभागाची कार्यपद्धती व त्यातील निश्‍चित मर्यादा लक्षात येत आहे. पुरातत्त्व विभागाने सातत्याने श्रमदान मोहिमा घेऊन जंजिरे वसई किल्ल्याचे अस्तित्व राखले पाहिजे. 
- डॉ. श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक, किल्ले वसई मोहीम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasai fort collapses due to rain