मुंबईतील युवकाची जमैकामध्ये हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई : जमैका येथे राहात असलेल्या मुंबईतील राकेश तलरेजा (वय 25) नावाच्या युवकाची दरोड्याच्या उद्देशाने चार अज्ञात हल्लेखोरांनी जमैकातील किंगस्टन येथील त्याच्या निवासस्थानी हत्या केली आहे. या घटनेत राकेशच्या दोन मित्रांच्या पायाला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते जखमी झाले आहेत.

मुंबई : जमैका येथे राहात असलेल्या मुंबईतील राकेश तलरेजा (वय 25) नावाच्या युवकाची दरोड्याच्या उद्देशाने चार अज्ञात हल्लेखोरांनी जमैकातील किंगस्टन येथील त्याच्या निवासस्थानी हत्या केली आहे. या घटनेत राकेशच्या दोन मित्रांच्या पायाला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते जखमी झाले आहेत.

किंगस्टन येथील कॅरिबियन ज्वेलर्समध्ये राकेश सेल्समनचे काम करत होता. त्याचे पालक मुंबईतील वसई येथील अंबाडी रस्ता येथे राहतात. शुक्रवारी सकाळी सात वाजता राकेश काम करत असलेल्या ज्वेलर्सच्या मालकाने राकेशच्या पालकांना फोनद्वारे या घटनेची माहिती देत राकेशचे निधन झाल्याचे कळविले. ज्वेलर्समध्ये जमा झालेल्या रकमेची चोरी होऊ नये म्हणून ज्वेलर्स मालकाने त्याच्याकडील कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या रकमेतील काही रक्कम सोबत घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. ही घटना दरोडेखोरांना माहिती असावी, अशी शक्‍यता राकेशच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

किंगस्टन येथे राकेश आपल्या दोन भारतीय मित्रांसोबत राहात होता. तेथे दरोड्याच्या उद्देशाने चार अज्ञात व्यक्ती घुसले. त्यावेळी राकेश पहिल्या मजल्यावर बेडरूममध्ये होता. दरोडेखोरांनी सुरूवातीला बंदुकीचा धाक दाखवत राकेशच्या मित्रांचा फोन आणि त्यांच्याकडील रोख रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी राकेशचा फोन घेण्याचा प्रयत्न केला. त्यास राकेशने प्रतिकार केला किंवा नाही याबाबत काहीही माहिती समजलेली नाही. त्यानंतर त्यांनी राकेशच्या पाठीत तीन गोळ्या घातल्या आणि त्याच्या मित्रांच्या दिशेनेही गोळीबार करत पळ काढला. राकेशला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्‌यात आले. तर, या घटनेत जखमी झालेल्या राकेशच्या मित्रांवर उपचार सुरु आहेत. या घटनेचा जमैकातील पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Vasai youth shot dead in Jamaica by robbers