वाशीतील हॉटेलची १० लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

बेंगलोरहून नवी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने वाशीतील प्रसिद्ध फोरपॉईंट हॉटेलमध्ये महिनाभर कुटुंबासह मुक्काम करून हॉटेलचे तब्बल १० लाख २५ हजार रुपयांचे बिल थकवून पलायन केल्याचे समोर आले आहे.

मुंबई : बेंगलोरहून नवी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने वाशीतील प्रसिद्ध फोरपॉईंट हॉटेलमध्ये महिनाभर कुटुंबासह मुक्काम करून हॉटेलचे तब्बल १० लाख २५ हजार रुपयांचे बिल थकवून पलायन केल्याचे समोर आले आहे. जोसेफ थॉमस अल्फान्सो असे या व्यक्तीचे नाव असून, वाशी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, त्याचा शोध सुरू केला आहे.  

आरोपी जोसेफ बंगलोरमधील अशोकनगरमध्ये राहण्यास असून, ५ मे २०१९ रोजी तो आपली पत्नी व मुलासह नवी मुंबईत आला होता. जोसेफने कुटुंबासह महिनाभर फोरपॉईंट हॉटेलमध्ये तळ ठोकला होता. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्याकडे खोली भाड्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने पत्नीला कॅन्सर झाल्याने तिच्यावर वाशीतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आल्याची थाप मारली. 

हॉटेलचे बिल ९ लाख रुपये झाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्यापाठीमागे हॉटेलचे बिल भरण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे जोसेफने ३ चेक देऊन कुटुंबासह पलायन केले. मात्र, जोसेफच्या बॅंक खात्यात पैसेच नसल्याने हे चेक वटले नाहीत. हॉटेेल व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी जोसेफविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vashi hotel cheats for 2 lakh rupees