वाशीतील खारफुटीत राडारोडा

वाशीतील खारफुटीलगत राडारोडा टाकला जात आहे
वाशीतील खारफुटीलगत राडारोडा टाकला जात आहे

नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल रस्तारुंदीकरण करताना वाशी येथील खारफुटीलगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. याबाबत संबंधित कक्षाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाशी गावच्या दिशेने असलेल्या खारफुटीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत टाकण्यात येणाऱ्या राडारोड्याबाबत नेचर कनेक्‍ट आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण; तसेच खारफुटी संरक्षण समितीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. एप्रिलच्या सुमारास लोकसभा निवडणूक असल्याने याबाबत कार्यवाही करण्यास संबंधित प्रशासनाने असमर्थता दर्शवली होती. सायन-पनवेल महामार्ग परिसरात रस्त्याला लागूनच खारफुटीचे जंगल आहे. त्यांच्या संरक्षणार्थ बफर झोन येथे पाहण्यास मिळत नाही. त्यामुळे येथे होणारा भराव खारफुटीसाठी हानिकारक असल्याचे मत नेचर कनेक्‍ट व एकविरा आई प्रतिष्ठान या संस्थांनी व्यक्त केले. खारफुटी संरक्षण समितीच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर समितीने येथील भराव थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही भराव सुरूच असल्याने दोन्ही संस्थांमार्फत याविषयी पाठपुरावा सुरूच होता.

गेल्या आठवड्यात वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे प्रादेशिक नायब तहसीलदार यांच्यामार्फत वाशी परिसरातील खारफुटीची पाहणी करण्यात आली. त्या वेळी हा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने सोडवण्यात येईल, असे वन विभागामार्फत सांगण्यात आले. तर राडारोडा खारफुटीवर नाही; तर खारफुटीला लागून टाकण्यात येत असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आला. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. नायब तहसीलदार कार्यालयातून, रस्तारुंदीकरणांतर्गत निर्माण होणारा राडारोडा खारफुटीलगत टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकांचे कारण देत याबाबत ठोस उपाययोजना करण्यात टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. रस्तारुंदीकरणाकरता राडारोडा वाशी गावपासून वाशी टोल नाक्‍यापर्यंतच्या खारफुटीत टाकत आहेत. त्यामुळे खारफुटीचा श्वास कोंडला जात आहे. बांधकाम विभाग खारफुटीलगत भराव करत असल्याचे म्हणते. पण पावसामुळे सर्व भराव खारफुटीवर वाहून गेला आहे. 
- बी. एन. कुमार, संचालक, नेचर कनेक्‍ट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com