वाहतूक कोंडीमुळे वसईकर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

वसईच्या जुन्या उड्डाणपुलाची दुरुस्ती रखडल्याने नागरिकांची गैरसोय

वसई ः वसई पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा अंबाडी येथील जुन्या उड्डाणपुलाची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा पूल रहदारीसाठी खुला केला जाईल, असे महापालिकेने सांगितले असले, तरी पुलाची चाचपणी आणि मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जुना पूल वाहतुकीसाठी खुला होईल, याची शक्‍यता धूसर आहे. त्यामुळे रोजची कोंडी कायम असून नागरिकांचा जाच सुटत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

वसई स्थानक ते वसई महामार्ग, नालासोपारा, विरार दिशेने ये-जा करण्यासाठी दोन पूल आहेत; मात्र यातील जुना पूल नादुरुस्त झाल्याने १० महिन्यांपासून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वसई पूर्वेला सातिवली, वालीव, गावराईपाडा, चिंचपाडा, वसई महामार्ग, गोलानी नाका, भोईदापाडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखाने आहे.

या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मुंबई, ठाणे, पालघर, दिवा, पनवेल भागातून नोकरदार ये-जा करतात; मात्र एकमेव पूल आणि त्यावरून दुतर्फा वाहतूक होत असल्याने वसंतनगरी, एव्हरशाईन, रेंजऑफिस, गोखिवरे भागात सकाळी आणि सायंकाळी वाहनांची कोंडी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अत्यावश्‍यक सेवांनादेखील याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच जुना पूल लवकरात लवकर दुरुस्त व्हावा; यासाठी वसई-विरार महापालिका पुलाचे काम कुठवर आले आहे, या संदर्भात रेल्वेच्या सातत्याने संपर्कात आहे. रेल्वेने ऑक्‍टोबरमध्ये वसई पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या अंबाडी येथील जुन्या पुलाचे काम पूर्ण होईल, असे स्पष्ट केले आहे.
राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasikar suffers from traffic congestion