कवडीमोल भाजी चढ्या भावात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

वाशी - सणासुदीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) खरेदी-विक्री मंदावली आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भावही कोसळले आहेत. त्यानंतरही बाजार समितीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील अनेक मंडया, किरकोळ बाजारांत भाजीपाला अव्वाच्या सव्वा भावाने विकण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांची भाज्यांच्या अशाप्रकारे वाढलेल्या भावामुळे होरपळ झाली आहे.

दिघ्यापासून बेलापूरपर्यंत विस्तारलेल्या नवी मुंबईच्या मध्यभागी वाशीत बाजार समिती आहे. या ठिकाणाहून सर्वांत जवळ असणाऱ्या वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर आणि कोपरखैरणेतील किरकोळ बाजारांतही भाजीपाल्याचे भाव चढेच आहेत. बाजार समितीत सध्या टोमॅटो प्रतिकिलो आठ ते ११ रुपये भाव आहे; मात्र वाशीच्या सेक्‍टर नऊ येथील किरकोळ बाजारात त्याचा भाव ३० ते ४० रुपये आहे. घाऊक बाजारात १० ते १५ रुपये भाव असलेला कांदा व बटाटा सीवूड्‌स सेक्‍टर ४८च्या बाजारात २५ ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्यात येत आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये आलेल्या शेतमालाच्या प्रमाणानुसार बाजारभाव कृषी पणन विभागामार्फत निश्‍चित करण्यात येतो; मात्र किरकोळ बाजारात त्यावर कोणाचाही अंकुश नसतो. फेरीवाल्यांच्या मनाप्रमाणे भाव आकारले जातात. ते ठरवताना फेरीवाल्याला भाजीपाला आणताना झालेला वाहतूक खर्च, फुटपाथवर बसण्यासाठीची हप्तेखोरी, खराब माल असा सर्व हिशेब जोडण्यात येतो; मात्र त्याचे प्रमाण हे फेरीवाल्यांच्या मर्जीप्रमाणे ठरवले जात असल्याने किरकोळ भाजारातील भाजीपाला हा नेहमी महागलेला आहे.

एपीएमसीमधील भाव (प्रतिकिलो) 
कांदा- ८ ते १०
बटाटा- १० ते १२
टोमॅटो- १०ते १२ 
भेंडी- १० ते १५ 
वांगी- १० ते १८ 
मटार- २० ते २५
कोबी- ८ ते १०
फ्लॉवर- १० ते १२ 
नेरूळ येथील किरकोळ बाजारात भाव (प्रतिकिलो)
कांदा- २० ते २५
बटाटा- २५ ते ३०
टोमॅटो- १५ ते २०
भेंडी- ५० ते ६०,
वांगी- ३० ते ३५
मटार- ६० ते ७०
कोबी- ४० ते ५०
फ्लॉवर- ५० ते ६०

घाऊक बाजारातून गृहिणी भाजीपाला आणत नाहीत. किरकोळ बाजारावर त्या अवलंबून असतात; मात्र किरकोळ बाजारात खूप महाग भाजीपाला खरेदी करावा लागतो. त्यामुळे घरातील महिन्याचे बजट कोसळते.
- शीतल तांबे, गृहिणी

Web Title: vegetables rate high in washi