भाजीपाल्याचे दर कोसळले; पुरवठ्यात भरघोस वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

किरकोळ बाजारात भाव चढेच
एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक चांगली झाली असली तर किरकोळ बाजारातील भाव चढेच राहीले आहेत. मुंबई, नवी मुंबई व ठाणे इकडे भाजीपाल्याचे दरांमध्ये घाऊक बाजारापेक्षा १० टक्‍क्‍यांनी वाढ झालेली निदर्शनास आली.

नवी मुंबई - गेले तीन दिवस राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतरही वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गुजरात, इंदूर, बेळगाव, बंगळुरूसह राज्यातील काही भागातून दोन दिवसांत तब्बल १२०० गाड्यांचा माल एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. परंतू भाजीपाल्याच्या पुरवठ्याच्या तुलनते पावसामुळे ग्राहकराजाने पाठ फिरवल्यामुळे भाजीपाल्याचे दर तब्बल २५ टक्‍क्‍यांनी कोसळले आहेत.

आठवडाभरापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बाजारातील भाज्या महागल्या होत्या. रोजच्या जेवणात वापरली जाणारी कोथिंबीर व मिर्ची चांगलीच वधारली होती. परंतू राज्यातील शेतमालाच्या पूरवठ्याला परराज्यातील भाजीपाल्याच्या मालाची जोड मिळाल्यामुळे समितीमधील बाजार कोसळले आहे. सध्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये गुजरात, इंदूर, बेळगाव, बंगळूरू येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. हा माल दूरवरून येत असल्याने राज्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याआधीच हा माल वाहनांतून मुंबईजवळ पोहोचला होता. त्यामुळे हा माल सुदैवाने नैसर्गिक आपत्तीमधून बचावल्याने बाजारात दाखल झाला. नाशिक आणि पुणे येथून नियमित येणारा भाजीपाला कमी झाला आहे. परंतू सांगली येथून आवक सुरू असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या बाजारात परराज्यातून चांगला शेतमाल येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम झाला नाही. मात्र बाजारात ग्राहक येत नसल्यामुळे मालाला भाव मिळत नाही.
- कैलास ताजणे, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetbale Rate Collapse Farmer Loss