वाहनांच्या "फिटनेस'चा देखावाच 

वाहनांच्या "फिटनेस'चा देखावाच 

मुंबई -  व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी 250 मीटरच्या ट्रॅकवर घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नेरूळ येथील ट्रॅकवर मोठ्या वाहनांची तपासणी 200 मीटर, तर रिक्षांची तपासणी 40 मीटर अंतरावरच घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. 

रस्त्यावर धावणाऱ्या व्यावसायिक वाहनांची दर दोन वर्षांनी फिटनेस तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र द्यायचे असते. या प्रक्रियेत ब्रेक तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. ताशी 30 किलोमीटर वेगात वाहनांची ब्रेक तपासणी करण्यासाठी प्रत्येक आरटीओ कार्यालयात 250 मीटरचा ट्रॅक बांधण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. 

नवी मुंबईतील नेरूळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकमेव टेस्टिंग ट्रॅक तयार करून दिला आहे. या 250 मीटर ट्रॅकचा पूर्ण उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या 20 मीटरचा वापर होत नसून, 220 मीटरवरूनच वाहने तपासणीसाठी सोडली जातात. म्हणजे फक्त 200 मीटर अंतरावर वाहनांची फिटनेस तपासणी केली जात असल्याचा प्रकार "सकाळ'च्या निदर्शनास आला आहे. आरटीओकडून वाहन तंदुरुस्ती चाचणीचा देखावाच केला जात असल्याचे "सकाळ'ने यापूर्वीही उघड केले होते. त्यानंतर आता नेरूळ येथील प्रकार समोर आला आहे. 

वडाळा, अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांसह दहिसर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अद्याप टेस्टिंग ट्रॅक नाही. त्यामुळे या आरटीओमधील वाहने ऐरोली, आणि डेपो, नेरूळ या ठिकाणी तपासणीसाठी पाठवली जातात. नेरूळ येथील टेस्टिंग ट्रॅकवर मोठी वाहने 200 मीटर आणि रिक्षा 40 मीटर अंतरावर चालवून तपासणी केली जाते. त्यामुळे आरटीओच्या फिटनेस तपासणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

"सकाळ'ने या ट्रॅकची पाहणी केल्यानंतर छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील अधिकाऱ्यांनी दमदाटी करून मज्जाव केला. परंतु, या संदर्भातील एकाही प्रश्‍नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. 

तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी... 
- ब्रेक चाचणी; टायर, वायपर, हॉर्नची तपासणी. 
- हेड लॅम्प, टेल लॅम्प, ब्रेक लॅम्प, इंडिकेटर आणि अन्य दिव्यांची तपासणी. 
- चेसिस व इंजिन क्रमांकाची खातरजमा, स्पीड गव्हर्नरच्या सुस्थितीची तपासणी. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 250 मीटरच्या ट्रॅकवरच वाहनांची फिटनेस तपासणी करण्याचा कार्यालयाचा आदेश आहे. त्याचे उल्लंघन होणे चुकीचे आहे. 
- दशरथ वाघोले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी 

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परिवहन विभागाकडून सुधारणा होत असल्याचे दिसत नाही. वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी ट्रॅक नाही. काही ठिकाणी तपासणी करताना मोटार वाहन निरीक्षक रस्त्याच्या कडेला उभे असतात. वाहनांच्या फिटनेस तपासणीतील गैरप्रकारांना परिवहन विभागाचे प्रधान सचिवच जबाबदार आहेत. 
- श्रीकांत कर्वे, सामाजिक कार्यकर्ता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com