वाहने अत्यावश्‍यक, तर फटाके चैन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - वाहनांचा वापर टाळता येणार नाही; मात्र फटाके चैन म्हणून फोडले जातात. त्यामुळे प्रदूषणाच्या चर्चेत वाहने आणि फटाके यांची तुलना करणे योग्य नाही, असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. फटाक्‍यांमुळे वायुप्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई - वाहनांचा वापर टाळता येणार नाही; मात्र फटाके चैन म्हणून फोडले जातात. त्यामुळे प्रदूषणाच्या चर्चेत वाहने आणि फटाके यांची तुलना करणे योग्य नाही, असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. फटाक्‍यांमुळे वायुप्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होते; मग फटाक्‍यांवरच बंदी का, असा प्रश्‍न मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान विचारला होता. फटाके जास्त करून दिवाळी व अन्य सणांच्या काळात फोडले जातात, वाहतूक मात्र अहोरात्र सुरू असते. असे असले तरी फटाक्‍यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला कमी लेखू नये.

फटाक्‍यांमुळे वायुप्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषण व कचऱ्याची निर्मितीही होते, असे पर्यावरण अभ्यासकांनी दाखवून दिले.

दैनंदिन कामकाजासाठी फटाके आवश्‍यक नाहीत; मात्र वाहने अत्यावश्‍यक आहेत, असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ देबी गोएंका यांनी केले. त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन चुकीचे आहे.

फटाक्‍यांवर बंदी घातल्यास अनेकांचे रोजगार बुडतील, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते; परंतु फटाक्‍यांच्या कारखान्यांत आगी लागून अनेकांचे जीव जातात. हे जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करायला हवा, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरणतज्ज्ञांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, असे मत पर्यावरण अभ्यासक ऋषी अगरवाल यांनी व्यक्त केले. वायुप्रदूषण हा गुंतागुंतीचा विषय आहे. वेगवेगळ्या मार्गांनी होणाऱ्या या प्रदूषणावर वेगवेगळ्या पद्धतींनी नियंत्रण आणावे लागेल.

वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांवर मात करण्यासाठी एकात्मिक आराखडा हवा; केवळ एका प्रकारच्या वायुप्रदूषणावर लक्ष केंद्रित करू नये. फक्त फटाक्‍यांवर बंदी घालू नये. त्यामुळे विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना आक्षेप घेण्याची संधी मिळेल, असेही अगरवाल यांनी सांगितले.

Web Title: Vehicle Important Crackers Air Pollution Environment