गोरेगावच्या व्यंकटेश महेश्‍वरी यांनी माऊंट एव्हरेस्ट केले सर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

कठीण परिश्रम, सरावात सातत्य यातून एव्हरेस्ट सर करणाऱ्यांच्या शौर्य कथा नवीन नाहीत; मात्र तज्ज्ञांकडून प्रशिक्षण नाही किंवा सरावाचा गाजावाजा न करता गोरेगावमध्ये राहणाऱ्या व्यंकटेश महेश्‍वरी यांनी 50 फुटी टॉवर आणि सह्याद्रीचे कडेकपारे सर करून माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. 
 

गोरेगाव - कठीण परिश्रम, सरावात सातत्य यातून एव्हरेस्ट सर करणाऱ्यांच्या शौर्य कथा नवीन नाहीत; मात्र तज्ज्ञांकडून प्रशिक्षण नाही किंवा सरावाचा गाजावाजा न करता गोरेगावमध्ये राहणाऱ्या व्यंकटेश महेश्‍वरी यांनी 50 फुटी टॉवर आणि सह्याद्रीचे कडेकपारे सर करून माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. 

सर्वसाधारणतः एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आवश्‍यक असते. त्यासाठी दार्जिलिंग आणि उत्तराखंडमध्ये ट्रेकर्स प्रशिक्षणासाठी जातात. कामाच्या व्यापातून वेळ न मिळाल्याने अखेर घराजवळच्या टॉवरवर चढून प्रशिक्षणाला सुरुवात केली. व्यंकटेश यांनी आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एव्हरेस्ट सर करण्यासाठी यशस्वी नियोजन केले. एका खासगी प्रशिक्षकाने त्यांना या चढाईसाठी मदत केली. 

गोरेगावच्या गोकुळधाम परिसरातील "डी बि वूड' या 50 मजली इमारतीच्या अंतर्गत भागातून चढाईचा सराव केला. एव्हरेस्ट चढाईसाठी ज्याप्रकारे पाठ आणि पोटावर ओझे उचलावे लागते, त्यानुसार एकूण 16 किलो वजन उचलून सराव केला. या टॉवरवर एकूण 10 वेळा चढ-उतार करत यशस्वी सराव केला. उंचावर ऑक्‍सिजनचा पुरवठाही कमी होतो. त्यानुसारही सराव पूर्ण केला. 

16 मे रोजी व्यंकटेश यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. यासाठी एकूण 45 दिवस लागल्याचे ते सांगतात. त्यातील 37 दिवस हे पाच हजार मीटर चालावे लागले. तिथल्या वातावरणात कमी होणारे ऑक्‍सिजनचे प्रमाण, बर्फवृष्टी, वारे, निचांकी तापमान, भूक यांचा त्रास होत असल्याचे व्यंकटेश सांगतात. पाच हजार मीटर उंचीवर एकूण 35 रात्री घालवल्या. अंगावर शहारे आणणारा तो उपक्रम होता, अशी माहिती त्यांनी दिली. 

सुरक्षा महत्त्वाची 
या अनुभवाबद्दल सांगताना ते म्हणतात, "आयुष्यात ठरवाल तर काहीही अशक्‍य नाही, कठीण परिश्रमांची जोड आणि सातत्याची जोड हवी.' इतर ट्रेकर्सना संदेश देताना ते सांगतात, प्रशिक्षकाच्या मदतीशिवाय हे शक्‍य नव्हते. प्रशिक्षण आणि सराव हवाच, त्याशिवाय सुरक्षितताही महत्त्वाची आहे. 

विशेष म्हणजे व्यंकटेश आदित्य बिर्ला या नामांकित कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांना ज्या पदावर काम करावे लागते, तेथे त्यांना खूप परिश्रम असून इतर कामांसाठी वेळ मिळत नाही. काही काळ त्यांनी कॅनडा आणि इंग्लंडमध्ये काम केल्यावरही त्यांनी आपले स्वप्न विसरले नाही. मातृभूमी आणि देवभूमीने आपल्याला पुन्हा मायभूमीत आणल्याचे व्यंकटेश अभिमानाने सांगतात. 

Web Title: Venkatesh Maheshwari of Goregaon marches to Mount Everest