समाजवादी नेते मोहम्मद खडस यांचे निधन; श्रमिकांना सकस आहार देणारा हरपला

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

मोहम्मद खडस यांनी तेराव्या वर्षापासून समाजवादी पक्षाचे काम सुरू केले. मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांच्या चळवळीतील आंदोलनात त्यांनी सक्रिय काम केले होते.

मुंबई : समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते मोहम्मदभाई खडस यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री त्यांच्या चुनाभट्टी येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फाफा उर्फ फातिमा खडस, चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार समर खडस असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी कोकणातील चिपळूण या मूळ गावी शुक्रवारी करण्यात येणार आहे असे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.

Image may contain: one or more people and glasses

वयाच्या तेराव्या वर्षापासून समाजवादी पक्षाचे काम सुरू केले. मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांच्या चळवळीतील आंदोलनात त्यांनी सक्रिय काम केले होते. सोबतच मुस्लिम समाजातील मागास घटकांच्या कारणांचा शोध घेऊन त्यांनी सवित्सर अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता. हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेल्या मुस्लिम तलाकपिडीत महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नेटाने बाजू मांडली होती.

आणीबाणीच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल त्यांनी १४ महिन्यांचा कारावास भोगला होता. उपेक्षित सफाई कामगारांच्या जीवनाचा अभ्यास करुन मोहम्मद खडस यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यासोबत नरकसफाईची गोष्ट हे पुस्तक लिहले आहे. त्यात सफाई कामगारांच्या जगण्याचे भीषण वास्तव त्यांनी जगासमोर मांडले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्याला त्यांनी नेहमी सक्रिय सहभाग घेतला होता.

राष्ट्र सेवा दलात ते काही काळ होते, पण युवकांना सामाजिक प्रश्नांचा ठोस कार्यक्रम द्यावा या हेतुने त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत समता आंदोलन नावाची वेगळी संघटना उभारली होती.महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे सामाजिक लढे, आंदोलने याविषयी त्यांना कमालीची आस्था होती. १९८० च्या दशकात पुण्यातील विषमता निर्मूलन परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबईतील अपना बाजारच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून मुंबईत स्थलांतरीत झालेल्यांना त्यांनी मदत केली. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या निधनाचे वृत समजताच, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार कपिल पाटील, रिपब्लिकन चळवळीतील गौतम सोनवणे, ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू यांच्यासह त्यांच्या सामाजिक राजकीय चळवळीतील व्यक्तींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran samajwadi leader muhammad khadas passed away