#InternationalYogaDay2018 उपराष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई : सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.

मुंबई : सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वांद्रे रेक्लमेशन जवळील योगा पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पुनम महाजन,आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, सहपोलिस आयुक्त देवेन भारती व्यासपीठावर उपस्थित होते.

योग ही भारताने जगाला दिलेली मौल्यवान भेट असल्याचा उल्लेख करीत उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले की, यावर्षी योगदिना निमित्त 'शांती साठी योग' अशी संकल्पना आहे. सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी योगासनं आवश्यक आहे. सकारात्मक विचार विकासासाठी आवश्यक असून त्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा जेणेकरून निरोगी आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती करणे शक्य होईल. बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढले आहेत ते योगामुळे दूर करणे सहज शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

आधुनिक जीवनशैलीत प्राचीन चिकित्सा असलेल्या योगाचे महत्व कायम - मुख्यमंत्री
योग दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनो मध्ये जागतिक योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि त्याचे स्वागत करीत आज जगातील 175 देशांमध्ये योगदिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय प्राचिन चिकित्सा पध्दती असलेल्या योगाला पुन्हा एकदा लोकमान्यता मिळाली आहे. शरीर व मन या दोघांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध व्याधींवर योग हितकारक ठरले आहेत. तरुणाईने आधुनिक जीवनशैली अंगीकारतानाच योगाभ्यासदेखील केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार आशीष शेलार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी व मुंबई महापालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगासने केली. योग मार्गदर्शक सुनयना यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: vice president and chief minister celebrates yoga day in mumbai