नवी मुंबईत मतदानाला संमिश्र प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पाऊस नसल्याने मतदारांचा चांगला प्रतिसाद ; निवडणूक आयोगाकडून सेल्फी, फुलांची सजावट आणि भेट देऊन मतदारांचे स्वागत 

नवी मुंबई, ता. 21 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळ पासून विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोपरखैरणेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

बेलापूर मतदार संघातून भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ही बेलापूरमध्ये सहकुटुंब जाऊन मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी नेरुळमध्ये मतदान केले.

 

पनवेलमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब पनवेल मधील गुजराती शाळेत जाऊन मतदान केले. शेकापचे उमेदवार हरेश केणी यांनी सुद्धा सपत्नीक मतदान केंद्रवर पोहचून मतदान केले.

उरणचे भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी, शिवसेनेचे उमेदवार आमदार मनोहर भोईर, शेकापचे उमेदवार विवेक पाटील यांनी आपल्या गावी मतदान केले. पावसाचे सावट दूर झाल्याने घरात बसलेला मतदार राजा मतदान केंद्रांवर पोहचला.

सकाळी कार्यालयात निघालेल्यानी मतदान करून कामावर जाणे पसंत केले. जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता निवडणूक आयोगाकडून काही मतदान केंद्रांवर फुले आणि फुग्यांची आकर्षक सजावट केली आहे. तर मतदानानंतर सेल्फी काढण्यासाठी एका सेल्फी पॉईंटची निर्मितीही केली आहे. या पॉईंटला मतदान करून झाल्यावर मतदारांचा सेल्फी काढण्यासाठी उपयोग होत आहे.

काही मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांना तुळशी रोपे भेट देऊन स्वागत केले जात होते. सकाळी 11 वाजे पर्यंत दोन्ही मतदार संघात 12 आणि 13 टक्के मतदानाची नोंद झाली.

WebTitle : vidhan sabha election 2019 mixed response for voting in navi mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha election 2019 mixed response for voting in navi mumbai