Vidhan Sabha 2019 : ठाण्यात वरुणराजाच्या विश्रांतीनंतरही मतदानाचा निरुत्साह

Vidhan Sabha 2019 : ठाण्यात वरुणराजाच्या विश्रांतीनंतरही मतदानाचा निरुत्साह

ठाणे, ता. 21 : विधानसभा निवडणुकीवर सकाळच्या सत्रात रिमझिम पावसाचे सावट होते. ढगही दाटून आल्याने तूरळक पावसातही सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, उदंड जनजगृती करूनही मतदानाला पुरेसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे अतिशय संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी 11 वाजल्यानंतर सूर्याने दर्शन दिल्याने कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 7 ते 9 या कालावधीत अवघे 5 टक्के मतदान झाले. मात्र, नंतरच्या दोन तासात मतदानाचा वेग किंचित वाढला आणि पहिल्या चार तासात साडेबारा टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात 35.50 टक्के तर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेमतेम 45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने नानाविध क्‍लृप्त्या लढवून जनजागृती केली होती. पावसाचे आरिष्ट टाळण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप आणि मैदानातील चिखलदेखील बुजवण्यात आला होता. एवढी मतदान सज्जता करूनही किंबहुना पावसाने उसंत घेतली असतानाही मतदानाला मतदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद लाभला नाही. दुपारी एक वाजेपर्यंत घोडबंदर रोडवरील हिरानंदानी संकुल येथील मतदान केंद्रात शुकशुकाट जाणवला होता. लोकसभेचा अनुभव लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवली होती. तर, लिफ्ट असणाऱ्या शाळा व इमारतीमधील मतदान केंद्रेच पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आली होती. या पहिल्या मजल्यावरील केंद्रातही ज्येष्ठांना जिने चढून पायपीट करीत मतदानाचा हक्क बजावावा लागला. 

खगोल अभ्यासक सोमण राहिले मतदानाविना 

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदार यादीत नाव गहाळ झाल्याने मतदानाच्या पवित्र हक्काला मुकावे लागलेले खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांना विधानसभा निवडणुकीसाठीही मतदानाला मुकावे लागले. या खेपेला त्यांचे नाव मतदार यादीत होते. मात्र, नेत्रविकार जडल्याने मतदानादिवशीच त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया पार पडल्याने त्यांना मतदानास जाता आले नाही, अशी माहिती सोमण कुटुंबीयांनी दिली. 

ठाण्यातील मतदानाचे हायलाईट्स 

  • ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील खारकर आळीतील पोलिस स्कूल आणि एनकेटी महाविद्यालयातील तर वसंतविहार शाळेतील लिफ्टची माहिती मतदारांना नसल्याने जिने चढून पहिला मजला गाठावा लागल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. 
  • एनकेटी शाळेत तर इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या लोखंडी जिन्याने मतदार पहिल्या मजल्यावर जात असल्याचे दिसून आले. एरव्ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी एक-दोन ठिकाणी तुरळक वादाच्या घटना घडल्या. 
  • धोकादायक इमारतीमधून स्थलांतरित झाल्याने अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याच्या तक्रारी आल्या. ठाणे शहर मतदार संघात ओमप्रकाश साबू या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबीयांची नावे मतदार यादीत होती. मात्र ओमप्रकाश यांचेच नाव आढळून आले नसल्याने त्यांनी नाराजी दर्शवली. 
  • सकाळी कळवा येथील मतदान केंद्रावर व्हीवीपॅट मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे दोन व्हीवीपॅट मशीन तातडीने बदलण्यात आल्या. पावसाळी वातावरणामुळे मशीनमध्ये मॉईश्‍चर आल्याने हा बिघाड उद्‌भवल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 
  • निवडणूक आयोगाने बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवल्याचा दावा केला असला तरी, पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रामध्ये लिफ्टची माहिती मतदारांना नसल्याने ज्येष्ठांना जिने चढून मतदानाचा हक्क बजावावा लागला. 
  • ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील पोस्टल मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. फणसळकर यांचे मुंबईतील भायखळा येथील मतदार यादीत नाव आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. 

WebTitle : vidhansabha 2019 thane district voting details

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com