Vidhansabha 2019 : युतीच्या भूमिकेवर इच्छुकांची दिशा!

शरद भसाळे
बुधवार, 22 मे 2019

असा आहे राजकीय पट

  • शिवसेना-भाजपचे मतदारसंघावर वर्चस्व
  • युती झाल्यास सहापैकी किमान चार जागांवर यश शक्‍य
  • काँग्रेस-राष्ट्रवादीला भिवंडी पूर्व आणि पश्‍चिमेतून आशा

लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (पूर्व) आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. एकमेव शहापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यामध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्याचेच पडसाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि मतदानावेळी उमटले होते. विधानसभेसाठी युतीच्या भूमिकेवरच सर्व गणिते अवलंबून आहेत. या मतदारसंघात शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, प्रकाश पाटील, भाजपकडून खासदार कपिल पाटील, किसन कथोरे यांच्या खेळीवर युतीची मदार राहील.

भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रूपेश म्हात्रे प्रमुख दावेदार आहेत; तर भाजपकडून संतोष शेट्टी, काँग्रेसकडून शोएब खान, तारीक फारुखी रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. भिवंडीतून भाजपचे आमदार महेश चौगुले प्रमुख दावेदार असतील, तर काँग्रेसचे माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, शिवसेनेचे साईनाथ पवार, राष्ट्रवादीचे शेख खालिद गुड्डू इच्छुकांच्या यादीत येऊ शकतात. भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांचे नाव आघाडीवर आहे. या मतदारसंघात युती झाल्यास शिवसेनेला विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कल्याण पश्‍चिम मतदारसंघावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे; मात्र पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने जागावाटपात हा कळीचा मुद्दा ठरु शकतो.

मुरबाडमधून भाजपला मताधिक्‍याची अपेक्षा आहे. शहापुरात मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा मागील निवडणुकीत आमदार झाले. त्यानंतर झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करून जिल्हा परिषदेतील सत्तेत भागीदारी मिळवली. त्यामुळे बरोरा कोणासोबत राहतील, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक 
भाजप - किसन कथोरे, नरेंद्र पवार, महेश चौगुले, शांताराम पाटील, दशरथ पाटील, संतोष शेट्टी.

शिवसेना - रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, विजय साळवी, वामन म्हात्रे, मंजूषा जाधव, मदनबुवा नाईक, साईनाथ पवार, मनोज काटेकर, नारायण चौधरी.

राष्ट्रवादी काँग्रेस - खालिद गुड्डू शेख, भगवान टावरे, सुभाष गोटीराम पवार.

काँग्रेस - रशीद ताहीर मोमीन, प्रदीप राका, शोएब खान, तारीक फारुखी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Yuti NCP Bhiwandi Constituency Politics