'मल्ल्या कामानिमित्त परदेशात गेल्याचा दावा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. 17) पूर्ण झाली. विशेष न्यायालय 26 डिसेंबरला निकाल जाहीर करणार आहे. 

मुंबई - ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. 17) पूर्ण झाली. विशेष न्यायालय 26 डिसेंबरला निकाल जाहीर करणार आहे. 

हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मल्ल्याविरोधात सीबीआय आणि ईडी यांनी गुन्हे दाखल केले आहेत. चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स वारंवार बजावूनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज ईडीच्या वतीने विशेष पीएमएलए न्यायालयात करण्यात आला होता. ईडीच्या अर्जाला मल्ल्याच्या वतीने ऍड्‌. अमित देसाई यांनी विरोध केला होता. मोटारीच्या स्पर्धेसाठी दोन वर्षांपूर्वी जिनिव्हाला गेलो होतो; त्या वेळी माझ्याविरोधात गुन्हा दाखल नव्हता, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला होता. 

फरार होण्याच्या उद्देशानेच मल्ल्या भारतातून गेला, असा दावा ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी सोमवारी या अर्जावरील सुनावणी पूर्ण केली आणि निकाल 26 डिसेंबरपर्यंत राखून ठेवल्याचे सांगितले. मल्ल्याच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात आले. व्यावसायिक कामानिमित्त परदेशात गेल्याचा दावा त्याने केला आहे. सध्या ब्रिटनमध्ये असलेला मल्ल्या याच्या भारताला प्रत्यार्पणाबाबत लंडन न्यायालयाने निर्देश दिले आहेत. 

Web Title: Vijay Mallya went abroad for the work