विजय माने यांची बंडखोरी म्यान

विजय माने यांनी मंदा म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला.
विजय माने यांनी मंदा म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला.

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची बंडाची तलवार अखेर म्यान झाली. सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता  बेलापूर मतदारसंघातील शिवसेनेतील रुसवे-फुगवे संपले आहेत.

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद असतानाही एकही जागा न मिळाल्याने विजय माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मात्र, वारंवार सांगूनही माने उमेदवारी मागे घेत नसल्यामुळे मानेंना हकालपट्टी करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला होता. 

याबाबत ठाण्यातील नेत्यांनी मानेंची मनधरणी करीत उगीच कारवाई होईल याचे गांभीर्य मानेंना पटवून दिले. त्यामुळे अखेर माने यांनी वडार भवन येथे पत्रकार परिषद घेत मंदा म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला. या प्रसंगी उमेदवार मंदा म्हात्रे, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते व वडार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले आणि पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. माने यांनी म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन टळणार असल्याने म्हात्रेंच्या मताधिक्‍यात वाढ होणार आहे.

पक्षाची ताकद असूनही आम्हाला उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी माझी मनधरणी केल्याने, तसेच पक्षाचे व माझ्या राजकीय कारकिर्दीचे नुकसान होऊ नये. म्हणून मंदा म्हात्रेंना जाहीर पाठिंबा देत आहे. यापुढे त्यांचा प्रचार करणार आहे.
- विजय माने, शहरप्रमुख, शिवसेना.

माने बंडखोरी करून माझ्याविरोधात उभे राहिले. तेव्हा त्यांना कमी लेखले नव्हते; परंतु त्यांच्यामुळे आपल्याच मित्र पक्षातील कार्यकर्ते विरोधात काम करतात. ही भावना मनाला पटत नव्हती; परंतु, त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता सर्व शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते एकत्रितरित्या निवडणूक कामाला लागतील.
-मंदा म्हात्रे, उमेदवार, भाजप-शिवसेना महायुती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com