विक्रमगड येथे जनजीवन पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नद्या नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्या पाण्याखाली

मुंबई : विक्रमगड तालुक्‍यात गेल्या पाच दिवसात धुवाधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने नदीनाले तुडूंब भरून वाहू लागले होते. अनेक नद्या नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. आज पावसाचा जोर कमी झाल्याने पूर कमी झाला आहे.

विक्रमगड-जव्हार मार्गावरील विक्रमगड आणि जव्हारची वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच विक्रमगड-डहाणू, मनोर-विक्रमगड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. दिवसभरात जनजीवन सुरळीत झाले आहे.

तालुक्‍यातील महत्त्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत; तर देहर्जा, पिंजाळ नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. मात्र, पाच दिवसांपासून सततच्या पावसाने भात शेती पाण्याखाली गेल्याने पिके कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikramgad public life