'गाववाल्यांच्या खोल्या' वाचवण्याची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - पाऊण शतकापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातील गावावरून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या गाववाल्यांनी गरजेपोटी "गाववाल्यांच्या खोल्या' उभारल्या. सामूहिक मालकीच्या या खोल्या पुनर्विकासात कोटींच्या लालसेने परस्पर विकण्याचे प्रकार सुरू झाल्याने त्याविरोधात गाववाल्यांनी दंड थोपटले आहेत.

"कोल्हापूर शिवशाहू प्रतिष्ठान'ने या गाववाल्यांच्या खोल्या वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई, ठाण्यात गाववाल्यांच्या मालकीच्या अशा चार हजार खोल्या असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सरचिटणीस जीवन भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले की, तीन पिढ्यांसाठी या खोल्या आम्हा चाकरमान्यांचे आश्रयस्थान होत्या आणि आजही आहे. अलीकडच्या काळात गावातील गटातटांचे राजकारण खोलीत शिरल्याने आणि पुनर्विकासात कोटीहून अधिक किंमत मिळत असल्याने या खोल्या ज्यांच्या नावावर आहेत, त्यांनी त्या विकण्याचा घाट घातला आहे. या वादातून हजारो चाकरमानी बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत 20 टक्के खोल्यांचे व्यवहार परस्पर झाले आहेत, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी सांगितले.

मालकी सर्वांची
गरजेपोटी कोणा एकाच्या नावावर खोल्या असल्या, तरी मालकी संपूर्ण गावाची किंवा गावच्या मंडळाची आहे. एकाच खोलीत 20-25 जणांचे वाहनचालक परवाने, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड काढण्यात आले. कामाच्या ठिकाणी पत्ताही याच खोलीचा आहे. खोलीवर कुणी एकट्याने हक्क सांगू शकत नाही, असे 30 वर्षे डिलाईल रोड येथील सोहराब चाळीतील गाववाल्यांच्या खोलीत राहणारे कृष्णा पाटील यांनी सांगितले.

Web Title: village people rooms saving campaign