पुलाच्‍या दुरुस्तीसाठी वाफेघर ग्रामस्थ एकवटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई :  सुधागड तालुक्‍यात पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्‍यातील वाफेघर गावाजवळील नदी पूल धोकादायक झाला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची माती रविवारी वाहून जाऊन तेथे भगदाड पडले होते. अखेर ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ५) पुलाची डागडुजी केली. तसेच पुलाला पडलेले भगदाड व खड्डे बुजविले.

मुंबई :  सुधागड तालुक्‍यात पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्‍यातील वाफेघर गावाजवळील नदी पूल धोकादायक झाला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची माती रविवारी (ता. ४) वाहून जाऊन तेथे भगदाड पडले होते. अखेर ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ५) पुलाची डागडुजी केली. तसेच पुलाला पडलेले भगदाड व खड्डे बुजविले आहेत.थोरामोठ्यांसह लहानग्यांनी एकत्र येत हातात घमेले आणि फावडे घेत श्रमदान केले.

या वेळी पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावरील माती वाहून गेलेल्या ठिकाणी मातीचा व खडीचा भराव टाकण्यात आला. भगदाड बुजविले. त्याबरोबरच पुलाला पडलेले खड्डे सिमेंट व वाळूने व्यवस्थित भरून घेतले गेले. सारे गाव एकजूट होऊन भर पावसात पुलाची दुरुस्ती करत होते. मागील दोन-तीन वर्षांपासून वाफेघर पुलाची दुरवस्था झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी पुलाचे बांधकाम कमकुवत झाले आहे. पुलाला कोणी वाली नसून ग्रामस्थच श्रमदान व स्वखर्चाने पुलाची डागडुजी करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर पुलाकडे लक्ष देऊन पुलाची व्यवस्थित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

केवळ ग्रामस्थांच्या पुढाकाराने व एकजुटीने पुलाची दुरुस्ती पुन्हा करण्‍यात आली. गावाच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थ नेहमीच तयार असतात. आता  बांधकाम विभागाने पुलाची वेळीच डागडुजी व दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता असल्‍याचे खवली ग्रामपंचायतीच्‍या सरपंच रुचिता बेलोसे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers consolidated to repair the bridge