Mumbai News : कोपर खाडीत बेकायदा रेती उपसा ग्रामस्थांनी केला उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Villagers exposed illegal sand mining Kopar Bay revenue department investigated and destroyed boat mumbai

Mumbai News : कोपर खाडीत बेकायदा रेती उपसा ग्रामस्थांनी केला उघड

डोंबिवली - डोंबिवली, कोपर, कल्याण खाडीत बेकायदा रेती उपसा सुरुच असून महसूल विभागाकडून वारंवार कारवाई होऊन ही रेती माफिया रेती उपसा करत आहेत. शनिवारी रात्री कोपर खाडीत बेकायदा रेती उपसा करणारी बाज ग्रामस्थांनी पकडली.

अंधाराचा फायदा घेत रेती माफिया व आणखी एका बाजने तेथून पळ काढला. परंतू एक बोट पकडण्यास ग्रामस्थांना यश आले. याची माहिती मिळताच नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर रेतीसाठा जप्त करत रेती उपसा करणारा बाज व संक्शन पंप हा कापून पेटवून देत नष्ट करण्यात आला.

डोंबिवली पूर्वेकडील कोपर खाडी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून बेकायदेशीर रित्या रेती उपसा सुरु आहे. यासोबतच डोंबिवली पश्चिम खाडी किनारा, कल्याण रेती बंदर आदि भागातही रेती उपसा सुरु असून महसूल विभागाकडून वारंवार कारवाई करण्यात येत असली तरी बेकायदेशीर रेती उपसा हा बंद झालेला नाही.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती माफिया मोठ्या प्रमाणात रेती उपसा करत आहेत. त्यामुळे खाडलगत असलेल्या शेतजमिनी नापीक बनत चालल्या आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

महसूल विभाग कारवाई देखील करते परंतू महसूल विभागाच्या हातावर तुरी देत रेती माफियांनी पळ काढला आहे. कोपर खाडीत रात्रीच्या अंधारात बेकायदा रेती उपसा सुरु असल्याची ग्रामस्थांनी केली होती.

शनिवारी रात्री खाडी परिसरात रेती उपसा सुरु असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत रेती माफियांना अटकाव करण्याच प्रयत्न केला. ग्रामस्थांचा आक्रमक पणा आणि ओहोटी सुरु झाल्याने बाजसोबत आलेल्या रेती माफियांनी तेथून पळ काढला.

तर बाज व बोट ही खाडी किनारीच अडकली. या घटनेची माहिती रविवारी सकाळी स्थानिक पोलिस आणि महसूल विभागास मिळाली. माहिती मिळताच महसूल विभागाच्या नायब तहसीलदार बांगर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

रेती उपसा करणारा संक्शन पंप, बाज कापत पेटवून दिली गेली. तर रेतीचा साठा हा जप्त केला. या कारवाईत तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून ही बोट कोणाची आहे याचा तपास केला जाणार आहे. संबंधित रेतीमाफियांचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती यावेळी महसूल विभागाच्या नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी दिली.