नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील गावे पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुसळधार पावसामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राजवळील पारगाव, रुद्रनगर, ओवळे, भंगारपाडा, दापोली या गावांमध्ये पाणी शिरले. डुंगी गावाप्रमाणेच या गावांनाही विमानतळासाठी झालेल्या भरावाचा फटका बसला असून, या गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राजवळील पारगाव, रुद्रनगर, ओवळे, भंगारपाडा, दापोली या गावांमध्ये पाणी शिरले. डुंगी गावाप्रमाणेच या गावांनाही विमानतळासाठी झालेल्या भरावाचा फटका बसला असून, या गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीबाबत कोणत्या उपाययोजना होणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. 

मुसळधार पावसामुळे पारगावच्या खालच्या आळीतील २५ ते ३० घरे पाण्याखाली गेली. डुंगी गावाला लागून असलेले रुद्रनगरमध्येही पाणी शिरले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसातही इथली घरे पाण्याखाली गेली होती. दापोली, भंगारपाडा, खालचे ओवळे या गावातही कमी अधिक प्रमाणात तीच स्थिती आहे; मात्र प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनामार्फत येथे कोणतीही मदत देण्यात आली नसल्याची माहिती पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी दिली. 

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावेळी डुंगी गावात पाणी शिरल्याने प्रशासनामार्फत त्या गावाची पाहणी झाली; मात्र डुंगीला लागूनच असलेली पारगाव व इतर गावेदेखील पाण्याखाली गेली असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

यापूर्वी कधीही गावात पाणी शिरले नव्हते. विमानतळासाठी भराव झाल्यानंतरच गेल्या वर्षीपासून आम्हाला या स्थितीला सामोरे जावे लागत आहे. ठोस उपाययोजना न केल्यास दर वर्षी हीच स्थिती उद्‌भवेल.
- रोहिदास म्हात्रे, पारगाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages of Navi Mumbai Airport area under water