
डोंबिवलीतील धक्कादायक घटना; वाहतूक पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत
डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील एस. के. पाटील चौक येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (वय 44) यांना एका चारचाकी गाडीने धडक देत फरफटत नेल्याची घटना बुधवारी घडली. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला असता त्याने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. यात होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे हे एस.के.पाटील चौकात आपले कर्तव्य बजावत होते. 6.30 च्या दरम्यान चौकातून लाल रंगाची चारचाकी गाडी जात होती. गाडीमध्ये मोठ्या आवाजात डेक लावलेला होता, तसेच गाडीच्या काचा देखील काळ्या होत्या. यामुळे होरे यांनी चालकास गाडी थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने गाडी न थांबविता होरे यांना धडक दिली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला. यादरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. होरे यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्यावरून पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस लाला कार चालकाचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले.
Web Title: Violence Of Traffic Rule Traffic Police Was Hit By Four Wheeler Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..