ठाणे शहर फणफणले! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

ठाणे - वातावरणात सध्या सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे ठाणे शहरातील नागरिक तापाने फणफणले आहेत. ताप आणि खोकल्याने मोठ्या माणसांसोबतच लहान मुलेही मोठ्या प्रमाणात आजारी पडत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. साधारण आठवडाभर आजाराचा परिणाम रुग्णावर दिसून येत आहे. रुग्णांनी जास्तीत जास्त आराम करून सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन डॉक्‍टर करीत आहेत. 

ठाणे - वातावरणात सध्या सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे ठाणे शहरातील नागरिक तापाने फणफणले आहेत. ताप आणि खोकल्याने मोठ्या माणसांसोबतच लहान मुलेही मोठ्या प्रमाणात आजारी पडत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. साधारण आठवडाभर आजाराचा परिणाम रुग्णावर दिसून येत आहे. रुग्णांनी जास्तीत जास्त आराम करून सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन डॉक्‍टर करीत आहेत. 

ढगाळ वातावरण, पाऊस आणि मध्येच उन्हाचे चटके अशा विषम वातावरणाचा परिणाम थेट ठाणेकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले. विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पाऊस-ऊन अशा झपाट्याने बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप आदी तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सहा ते सात दिवसांत रुग्ण बरा होतो; पण त्यासाठी तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दिवसाला 50 ते 60 रुग्ण आपआपल्या विभागातील दवाखान्यांत खासगी डॉक्‍टरांकडे उपचारासाठी येत आहेत. त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण 25 टक्के असल्याचे डॉ. विलास बोऱ्हाडे यांनी सांगितले. ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे मुलांना शाळेत पाठवू नये. त्यातून शाळेतील इतर मुलांना संसर्ग होण्याची शक्‍यता असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण असल्याने लहान मुलांसोबतच मोठी माणसेही ताप आणि खोकल्याने जास्त हैराण आहेत. घशाचा संसर्ग होऊन खोकला वाढीस लागतो. क्वचितप्रसंगी घशाला सूज येणे असे प्रकार रुग्णांमध्ये आढळत आहेत. ताप व खोकल्याबरोबरच डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी रुग्ण करीत आहेत. सध्या डेंगीच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने वातावरणातील बदलांमुळे आलेली कणकण आणि डेंगीचा ताप याचे अचूक निदान करण्याचे आव्हान डॉक्‍टरांनी केले आहे. 

आजार अंगावर काढू नका 
ताप, थंडी व खोकल्यावर नागरिकांनी तातडीने उपचार घेणे आवश्‍यक आहे. घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्‍टरांनी सुचविलेल्या चाचण्याही तातडीने कराव्यात. अनेकदा रुग्ण चाचणी करून घेत नाहीत. एक-दोन दिवसांत आजार बरा होईल, असे मानून घरीच रहातात. परंतु सात ते आठ दिवसांच्या वर आजाराची लक्षणे दिसल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता असते. योग्य काळजी घेतल्यास डॉक्‍टरांना अचूक निदान व उपचार करणे सोयीचे जाते, असे डॉ. अनघा काळे यांनी सांगितले. 

हे करा... 
- उकळून गार केलेले पाणी प्या 
- जास्तीत जास्त विश्रांती घ्या 
- डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे वेळेत औषधे घ्या 

हे टाळा... 
- वैद्यकीय सल्ल्याशिवाय बाहेरील औषधे घेऊ नका 
- गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका 
- बाहेरचे व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका 
- अंगावर आजारपण काढणे टाळा 

Web Title: viral fever in Thane