मुंबई महानगरात पहिले इको-टुरिझम गाव विरारमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virar first eco-tourism village in Mumbai metropolis Marine Biodiversity Introduction Center opened

मुंबई महानगरात पहिले इको-टुरिझम गाव विरारमध्ये

मुंबई : कांदळवन कक्षाने मारंबळपाडा, विरार येथे मुंबई महानगर प्रदेशातील पहिले इको टुरिझम गाव विकसित करण्याची योजना आखत वातावरण बदलाच्या लढ्याला गती दिली आहे. मारंबळपाडा येथील कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. विरारपासून बोटीने कांदळवन सफारीची सुविधा उपलब्ध असून हे मुंबई परिसरातील पहिले इको-टुरिझम गाव ठरले आहे.

मारंबळपाडा येथील कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र हे या परिसरातील इको-टुरिझम विकास करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. येथे भेट देणाऱ्यांसाठी कांदळवनात बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, पक्षी निरीक्षण, मॅन्ग्रोव्ह बोर्डवॉक, बेटाला भेट असे अनेक उपक्रम विरार परिसरात उपलब्ध असतील. या केंद्राचा खर्च सुमारे ४५ लाख रुपये असून त्यामध्ये इनरव्हील क्लबचे १५ लाख रुपयांचे योगदान आहे; तर उर्वरित निधी हा कांदळवन कक्षांतर्गत असलेल्या कांदळवन प्रतिष्ठानकडून देण्यात आला आहे.

कांदळवनांचे नुकसान न करता तीन कंटेनरच्या माध्यमातून केंद्र बांधण्यात आले आहे. येथे भेट देणाऱ्यांसाठी स्थानिक संस्कृती, कांदळवन आणि अनुषंगिक जैवविविधता याबाबतच्या माहितीचे आकर्षक पद्धतीने मांडलेले प्रदर्शन पाहायला मिळेल. मारंबळपाडा वैतरणा नदी व अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला आहे. इको-टुरिझम केंद्र विरार रेल्वेस्थानकापासून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

३६० अंशांतील डेकची सुविधा

सभोवतालच्या अवलोकनासाठी असलेला डेक ही या केंद्राची अनोखी बाब असून या डेकवरून मारंबळपाड्याचे ३६० अंशातील विहंगम दृश्य दिसते. तसेच शेजारी असलेली मेरिटाईम बोर्डाची निवारा शेडही कांदळवन संवर्धनाच्या अनुषंगाने रंगवण्यास बोर्डाने परवानगी दिली आहे, असे कांदळवन प्रतिष्ठानच्या पर्यावरण शास्त्रज्ञ आणि उपसंचालक (प्रकल्प) डॉ. शीतल पाचपांडे यांनी सांगितले.

फेरी बोटीची व्यवस्था

इको-टुरिझम गावासाठी दहा लाख रुपयांच्या बोटीची खरेदी केली असून ‘इंद्रायणी’ असे तिचे नामकरण केले आहे. या बोटीचे संचालन गावकऱ्यांमार्फत होईल. या बारा आसनी बोटीतून पर्यटकांना कांदळवनाची सुंदर झलक पाहता येईल. ही बोट कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये एक लाख रुपये हे समूहातील सदस्यांनी; तर नऊ लाख रुपये कांदळवन प्रतिष्ठानाकडून देण्यात आले आहेत.

या केंद्राच्या विकासामुळे मारंबळपाडा येथील इको-टुरिझमला चालना मिळण्याबरोबरच येथे भेट देणाऱ्यांच्या अनुभवात भर पडेल. तसेच स्थानिकांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण करण्यात उपयोगी ठरेल. या केंद्रामुळे स्थानिकांचा कांदळवन संवर्धनातील सहभाग वाढण्यास प्रोत्साहन मिळेल.

- वीरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष)

Web Title: Virar First Eco Tourism Village In Mumbai Metropolis Marine Biodiversity Introduction Center Opened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..