नियमांच्या कचाट्यात स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन

संदीप पंडित
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

विरार - गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले नायगाव येथील एक स्वातंत्र्यसैनिक दोन राज्यांच्या वेगवेगळ्या सीमा आणि किचकट नियमांमुळे पेन्शनसाठी म्हातारपणात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सरकार दरबारी खेटा मारत आहेत.

विरार - गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले नायगाव येथील एक स्वातंत्र्यसैनिक दोन राज्यांच्या वेगवेगळ्या सीमा आणि किचकट नियमांमुळे पेन्शनसाठी म्हातारपणात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सरकार दरबारी खेटा मारत आहेत.

हरिंद्रनाथ शेट्टी (वय 80) हे गेली 50 वर्षे वसईत राहतात. मूळ गाव कर्नाटक. शेट्टी यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. 15 ऑगस्ट 1955 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी सत्याग्रहासाठी त्यांची तुकडी मंगलोरहून बांद्रामार्गे सारवोळीकडे निघाली. या 23 जणांच्या तुकडीचे कम्युनिस्ट कार्यकर्ते बी. काकलिया हे नेते होते. त्यांच्यासह देशाच्या इतर भागांतून विविध पक्षांतर्फे आलेले सत्याग्रही होते.

50 वर्षांपासून शेट्टी वसई-नायगावमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पेन्शनची जबाबदारी दोन्ही राज्यांचे सरकार डावलत आहेत. विविध नियमावलींच्या कचाट्यात लढवय्या स्वातंत्र्यसैनिकाला जिवंतपणी मरणयातना सोसाव्या लागत आहेत. म्हातारपणात वैद्यकीय सेवांसाठी लागणारा आवश्‍यक खर्च भागवतानाही त्यांना कसरत करावी लागत आहे.

या सर्वांचे तीन गट करून त्यांना विविध कॅम्पमध्ये पाठविले. 15 ऑगस्टच्या पहाटेच त्यांनी गोव्याच्या दिशेने कूच केले. या वेळी पोर्तुगीज सैनिकांनी या सत्याग्रहींवर हल्ला केला. बेदम मारहाण केली, रायफलीच्या दस्त्यानी केलेल्या प्रहारामुळे पुढेच असलेल्या शेट्टींचे डोके फुटले. ते रक्तबंबाळ झाले. काकलियांवर होणाऱ्या हल्ल्यातून त्यांना वाचविण्यासाठी त्याच स्थितीत शेट्टींनी आपला उजवा हात मधे घातला. यात त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. पोर्तुगीज सैनिकांनी त्यांना बाजूच्या नाल्यात फेकले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सावंतवाडीतील रुग्णालयात दाखल केले. जखमा बऱ्या झाल्यानंतर ते आपल्या गावी गेल्याचे शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

काही वर्षांनी ते उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. लहान-मोठी कामे करून आपले घर चालवत होते. 1986 मध्ये झालेल्या मोटार अपघातात त्यांची नोकरीही गेली. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मानधन व पेन्शन मिळणार असल्याचे त्यांना समजले. ही घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असताना केल्याचे शेट्टी म्हणाले. त्यांनी या पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी धडपड केली. यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या वेळचे नेते काकलिया यांचे शिफारस पत्र व सत्याग्रहात सहभाग घेतल्यामुळे झालेल्या मारहाणीत डोक्‍याला इजा झल्यामुळे पट्टा बांधलेल्या अवस्थेतील आपले फोटो अर्जासोबत जोडले; पण तरीही काहीच फायदा झाला नाही. याबाबत त्यांना जॉर्ज फर्नांडिस यांनीही मदतीचा हात दिला होता; परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली. त्यामुळे म्हातारपणात तरी न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

Web Title: virar news mumbai news freedom fighter pension