विष्णुदास भावे नाट्यगृह दीर्घकाळ बंद!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला मार्चपासून सुरुवात करण्यात आली. हे नाट्यगृह नोव्हेंबर २०१९ पर्यंत नागरिकांसाठी खुले करण्यात येणार होते; मात्र अतिरिक्त काम वाढल्याने आता जानेवारी २०२० मध्ये हे नाट्यगृह नागरिकांसाठी खुले होणार आहे.

नवी मुंबई : विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला मार्चपासून सुरुवात करण्यात आली. हे नाट्यगृह नोव्हेंबर २०१९ पर्यंत नागरिकांसाठी खुले करण्यात येणार होते; मात्र अतिरिक्त काम वाढल्याने आता जानेवारी २०२० मध्ये हे नाट्यगृह नागरिकांसाठी खुले होणार आहे. दरम्यानच्या कालावधीत नाट्यगृह १० ते ११ महिने बंद असल्याने नाटक व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमातून पालिकेला मिळणारा महसूल बुडाला आहे.

नवी मुंबई शहरात नागरिकांच्या मनोरंजनासाठी सध्या एकमेव व नामांकित असे विष्णुदास भावे नाट्यगृह उपलब्ध आहे; मात्र मार्च २०१९ पासून नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करणे, स्थापत्य कामे, प्रेक्षागृहातील नवीन खुर्च्या बसविणे, नाट्यगृहामधील कलावंत विश्रांती कक्ष व खोल्या त्याचबरोबर कार्यालयाचे नूतनीकरण, अग्निशमन यंत्रणा बसविणे, दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेशासाठी बॅरिअर फ्री प्रवेश व्यवस्था, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविणे, संरक्षक भिंतीची सुधारणा करणे, अद्ययावत प्रकाशयोजना व्यवस्था करणे, वातानुकूलित व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, ध्वनी व प्रकाशयोजना नियंत्रण यंत्रणा बसविणे, कॉस्टिकविषयक कामे करणे, वीज, ध्वनी व प्रकाशयोजनाविषयक कामे करणे ही कामे हाती घेण्यात आली होती; मात्र पालिका आयुक्तांनी अतिरिक्त कामाचे आदेश दिले आहेत. यामध्ये बाहेरील नूतनीकरण, पार्किंग व्यवस्था यात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढीव काम निघाल्याने नोव्हेंबरमध्ये खुले होणारे नाट्यगृह आता जानेवारी महिन्यात नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

७८ लाख २० हजार रुपयांवर पाणी
मार्च ते डिसेंबर या कालावधीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी, ख्रिसमस इत्यादी सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांमध्ये बरेच नाट्यरसिक मनोरंजनासाठी नाटकांना पसंती देत असतात. तसेच या कालावधीत बरेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम, दिवाळी पहाटचे कार्यक्रमदेखील या नाट्यगृहात आयोजित केले जातात. मागील वर्षी मार्च २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नाट्यगृहात मनोरंजनात्मक कार्यक्रमातून ७८ लाख २० हजार रुपये महसूल प्राप्त झाला होता. मात्र या वर्षी या कालावधीत हे नाट्यगृह पूर्णतः बंद असल्याने पालिकेला यातून मिळणारा महसूल बुडाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishnudas Bhave theater closed for a long time!