विठ्ठलवाडी तलावाला नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

कल्याण पूर्वमधील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळील गटारगंगेचे स्वरुप आलेल्या तलावाला लवकरच संजीवनी मिळण्याची शक्‍यता आहे. तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली निविदा अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेने जाहीर केली आहे. प्रतिवर्ष खर्च नऊ लाख, असे तीन वर्षे 27 लाख रुपये खर्चाची ही निविदा असून, प्रतिसाद मिळताच संबंधित ठेकेदारामार्फत तलावाची स्वच्छता करण्यात येणार आहे. 

कल्याण : कल्याण पूर्वमधील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळील गटारगंगेचे स्वरुप आलेल्या तलावाला लवकरच संजीवनी मिळण्याची शक्‍यता आहे. तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली निविदा अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेने जाहीर केली आहे. प्रतिवर्ष खर्च नऊ लाख, असे तीन वर्षे 27 लाख रुपये खर्चाची ही निविदा असून, प्रतिसाद मिळताच संबंधित ठेकेदारामार्फत तलावाची स्वच्छता करण्यात येणार आहे. 

कल्याण पूर्वेकडील पूनालिंक रस्त्यावर विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळ हा गणेश तलाव आहे. यापूर्वी महापालिकेने सुमारे 20 लाखांहून अधिक खर्च करत या तलावाचे सुशोभीकरण केले होते. तलावाचे उद्‌घाटन 30 ऑगस्ट 2015 ला युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. मात्र, त्याला काही महिने होत नाही तोच या तलावाची दुरवस्था झाली. आजूबाजूच्या इमारतींचे सांडपाणी आणि कचरा यामुळे तलावाची दुरवस्था झाली होती.

त्यामुळे पालिकेने खर्च केलेला निधी वाया गेला. तलावाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक आमदार गणपत गायकवाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करत निधीही उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार कामही झाले. मात्र, तलावाजवळून जाणाऱ्या मलनिस्सारण वाहिनीमधील पाणी, शेजारील नागरिक टाकत असलेला कचरा आणि तलावात निर्माण होणारी हिरवळ यामुळे या तलावाला बकालपणा आला आहे.
 
तलावासाठी वारंवार खर्च करून स्वच्छता करण्यापेक्षा खासगी ठेकेदार नेमून त्याच्यावर तलावाची निगा राखण्याची जबाबदारी सोपवावी, अशा सूचनेचे पत्र प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी पालिका प्रशासनाला पाठवले होते. सद्यस्थितीत या तलावाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन ही दुरवस्था त्यांच्या समोर मांडली.

याची दखल घेत आयुक्तांनी निविदा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितामुळे निविदा जाहीर करण्यास अडथळा येत होता. आता आचारसंहिता संपताच पालिकेने निविदा प्रसिद्ध केली असून त्याला प्रतिसाद मिळताच ठेकेदारामार्फत तलावाची आगामी तीन वर्षांसाठी स्वच्छता करण्यात येणार आहे. 

नागरिकांनी तलावात कचरा टाकू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराने प्रतिबंध करायचा असून तरीही नागरिकांनी कचरा टाकल्यास तोही कचरा साफ करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. संबंधित ठेकेदाराने तेथे बोटिंग सेवा सुरू केल्यास त्याने तसा प्रस्ताव मांडल्यास भविष्यात विचारही केला जाईल. 
- रघुवीर शेळके, 
कार्यकारी अभियंता 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthalwadi Lake gets Navasjivani