शक्तिशाली महाराष्ट्रासाठी मतदान करा : रामदास आठवले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बुधवारी (ता. 16) दादासाहेब गायकवाड मैदानात ही प्रचार सभा झाली. यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या लोकगीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. 

रामदास आठवले यांनी कवितेने भाषणाला सुरुवात करत मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. माझे उमेदवार हे "कमळ' चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखले. सत्तेवर राहावे ही डॉ. बाबासाहेबांची भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अजून दहा वर्षे आपल्यासोबत राहिले असते तर ते देशाचे "चांगले पंतप्रधान' असते, असेही रामदास आठवले म्हणाले. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व पुढे आले. रिपब्लिकन आणि वंचित आघाडीच्या ऐक्‍याला आपण आजही तयार आहोत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला चांगली मते मिळाली आहेत. मात्र मते खाण्याचे राजकारण करून सत्ता मिळणार नाही. सत्ता हवी असेल तर आपल्यासारखे राजकारण केले पाहिजे, असा सल्लाही आठवले यांनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दिला. 

विकासकामे केली असताना निवडणूक प्रचारामध्ये विरोधक खालच्या पातळीवर जाऊन समाजमाध्यमांवर टीका करतात. हिंमत असेल तर मैदानामध्ये येऊन समोरासमोर प्रश्‍न-उत्तरे करा, असे आवाहन यावेळी गणपत गायकवाड यांनी केले. घोटाळेबाज आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बंडखोरांना मत देणार का? असा सवालही गायकवाड यांनी केला. याप्रसंगी अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, सुबोध भारत, अण्णा रोकडे, प्रल्हाद जाधव, नाना सूर्यवंशी, संदीप तांबे आदी उपस्थित होते. 

राज ठाकरे अपयशी ठरणार 
राज ठाकरे यांना यश नव्हे अपयश मिळणार आहे. कारण राज करिष्मा आहे, तो केवळ भाषण ऐकण्यापुरता लोकांमध्ये आहे. त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले आहे, भाषण चांगले असते; परंतु मते मिळत नाहीत. त्यांना विरोधी पक्षाचे नेतृत्व मिळण्यासाठी तेवढी मते मिळणार नसल्याचे सांगत रामदास आठवले यांनी राज यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vote for the powerful Maharashtra: Ramdas Athawale