बालदींच्या विकासाच्या मुद्द्याला पसंती 

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

शेकाप व सेनेच्या जातीच्या राजकारणाला अपयश 

उरण  : अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी सेनेचे मनोहर भोईर यांच्यावर पाच हजार 718 मतांनी विजय मिळविला; तर सुरवातीपासून चुरशीचे वातावरण निर्माण करणारे शेकापचे विवेक पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे महेश बालदींच्या विकासाच्या मुद्द्याला जनतेने पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. 

सुरुवातीच्या बऱ्याच फेऱ्यांमध्ये महेश बालदी व विवेक पाटील यांच्यामध्ये चुरस पहायला मिळाली. काही फेऱ्यांत विवेक पाटील यांना अल्पशी आघाडी मिळाली होती; मात्र बहुतेक फेऱ्यांअखेर बालदी आघाडी टिकवून होते; तर शेवटच्या फेऱ्यांमध्ये सेनेचे मनोहर भोईर यांनी बालदी आणि विवेक पाटील यांना मागे टाकत बालदींना कॉंटे की टक्‍कर दिली. 

या निवडणुकीत बालदींच्या विरोधकांनी जातीचा मुद्दा प्रचारात उचलून धरला होता. मात्र, उरणमधील युवा पिढीला हे प्रचाराचे मुद्दे काही भावले नाहीत. याउलट बालदींनी प्रत्येक सभेत केलेली व भविष्यात करणार असलेल्या कामांचा प्रचार केला. त्याचा फायदा त्यांना झाला असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 

मनोहर भोईर यांना भोवलेले मुद्दे 
जाहीरनाम्यात लिहिलेली न झालेली कामे. 
रस्ते अपघात, वाहतूक कोंडी, निकृष्ट दर्जाची रस्त्यांची कामे, प्रदूषण याकडील दुर्लक्ष. 
नरेंद्र मोदी यांना मनोहर भोईर यांनी दाखवलेले काळे झेंडे. 
प्रचार सभेत विकासाच्या मुद्द्यांवर कमी; मात्र बालदी यांच्या जातीवर भाष्य करण्यावर भर. 

विवेक पाटील यांना भोवलेले मुद्दे 
कर्नाळा बॅंकेत सुरू असलेला व्यवहार. 
चढत्या कार्यकाळात सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष. 
विरोधकांवर सीमा ओलांडून केलेली टीका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voters Prefer the issue of development