पोलादपुरात पावसातही मतदारांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर कायम असल्याने मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती.

पोलादपूर (बातमीदार) : दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर कायम असल्याने मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मात्र, सायंकाळी ४ नंतर पावसाची रिपरिप सुरू झाली तरी मतदान केंद्रावर त्याच उत्साहात मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. या वेळी तरुणाई मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावताना दिसली. पोलादपुरात ५८ टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान झाल्याची नोंद झाली आहे. 

पोलादपूर शहर व तालुक्‍यात ६९ मतदान केंद्रावर मतदान सुरळीतपणे पार पडले. ४२ हजार ४५३ मतदारांपैकी महिला २१ हजार ६९४, तर पुरुष २० हजार ५५९ मतदार होते. मतदान सुरू होण्यापूर्वीच सकाळी पोलादपूर येथील चार केंद्रांतील मशीनमध्ये बिघाड झाला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्यामुळे मतदारांना कोणताही त्रास झाला नाही. 

मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजताच मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात सकाळी लवकरच मतदान करून मोकळे होण्याकडे मतदारांचा कल दिसून आला; मात्र सायंकाळी ४ वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली तरी मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. पोलादपूर सहपोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त मतदान केंद्रांवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे मतदान सुरळीतपणे पार पडले. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी मतदान केंद्राबाहेर १०० मीटर पलीकडे मतदारांना आणणाऱ्या वाहनांची आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. विविध चर्चांना या वेळी उधाण आले होते.

मतदान हा आपला अधिकार आहे. त्यामुळे तरुणाईने मतदानाचा हक्क बजावायलाच हवा. म्हणून कर्तव्य म्हणून मी वेळेवर मतदान केंद्रात जाऊन माझे मत एका चांगल्या उमेदवाराला दिले आहे.
- राज पवार, नवमतदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter's rush on booth for vote in Poladpur