36 ठिकाणी होणार मतमोजणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 36 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या मतदानाची 14 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, प्रत्येक मोजणी केंद्रावर सुमारे 300 ते 400 कर्मचारी काम करणार आहेत. 

मुंबई : मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 36 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या मतदानाची 14 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, प्रत्येक मोजणी केंद्रावर सुमारे 300 ते 400 कर्मचारी काम करणार आहेत. 

विधानसभेच्या मुंबईतील 36 जागांसाठी 333 उमेदवार मैदानात आहेत. त्यात भायखळा मतदारसंघात चौरंगी लढत; तर उर्वरित ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढत होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई पोलिस, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा बल यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रासाठी 150 ते 200 अधिकारी आणि जवानांचा ताफा असेल. मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी जागा ठरवण्यात आली आहे. दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅरिकेडस्‌ ठेवण्यात येणार आहेत. 

मुंबईत सरासरी 51 टक्के मतदान झाले आहे. पोस्टल मतांपासून मतमोजणीची सुरुवात होणार आहे. इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमने मते बारकोडने मोजली जातील. नियमित पोस्टल मतदान मोजल्यावर 9 वाजल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

साध्या वेशातील पोलिस 
मुंबईत 12 मतदारसंघांत जबरदस्त चुरस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यकर्ते व जमावामध्ये साध्या वेशातील पोलिसही तैनात असतील. तसेच काही संवेदनशील ठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Votes Counting will take in 36 places