ऐरोली, बेलापूरात मतदान मंदावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दोन्ही मतदारसंघात संध्याकाळपर्यंत सरासरी ५० टक्के एवढी मतदानाची नोंद झाली.

नवी मुंबई : विधानसभा मतदानासाठी दरवेळेप्रमाणे यंदाच्या मतदान प्रक्रियेतही मतदारराजाचा निरुत्साह पाहायला मिळाला. पावसाचे सावट असल्याने मतदान कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती; परंतु वरुणराजाने उघडीप घेतल्यानंतरही मतदान केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात मतदार फिरकले नाही. त्यामुळे ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. दोन्ही मतदारसंघात संध्याकाळपर्यंत सरासरी ५० टक्के एवढी मतदानाची नोंद झाली.
 
ऐरोली आणि बेलापूरमधील ८२६ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात शांततेत मतदान पार पडले. अनेक मतदान केंद्रांबाहेर शंभर मीटरच्या अंतरावर खाजगी वाहने पोलिसांकडून अडवण्यात येत होती; तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने लढवलेल्या वेगवेगळ्या क्‍लृप्त्याही निष्फळ ठरल्या. दोन्ही मतदारसंघात संध्याकाळपर्यंत सरासरी ५० टक्के एवढी मतदानाची नोंद झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागायच्या, ते दृश्‍य यावेळच्या निवडणुकीत फार तुरळक ठिकाणी दिसत होते. दिघा, चिंचपाडा, गणेशनगर, गणपतीपाडा, तुर्भे स्टोअर्स आणि तुर्भे नाका या भागातील झोपडपट्टी विभागात सकाळी रांगा लागल्याचे वातावरण यावेळच्या निवडणुकीत दिसले नाही. गावठाणातही यंदाच्या वर्षी मतदारांमध्ये निरुत्साह जाणवला. मात्र शहरी भागातील मतदारांनी चांगले मतदान केले. सकाळी अनेक नवमतदारांनी आणि कार्यालयांत जाणाऱ्यांनी आधी मतदानाचा हक्क बजावला. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न करता थेट मतदानाचा लाभ निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला. अपंगांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध केलेल्या रिक्षांचा अनेक अपंगांनी लाभ घेतला. 

केंद्रांवरील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह?
राज्यभरात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना महायुतीचे वातावरण असल्याने ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे पारडे जड आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. या चढाओढीतून काही कार्यकर्त्यांनी चक्क मतदान करताना ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनचे मोबाईलने छायाचित्र काढून निष्ठा सिद्ध केली. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मतदान केंद्रांवरील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

बोगस मतदानाची तक्रार
ऐरोली मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवार हेमंत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting slumped in airoli, Belapur