
सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई, ता. 20 ः सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. वीस वर्षे नोकरी झाल्यानंतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येईल. महापौरपदाचा कार्यकाळ संपताना विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा निर्णय घेतला आहे.
सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना ठराविक काळ नोकरी केल्यानंतर इच्छा असल्यास निवृत्ती घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे नियत वयोमानानुसार निवृत्त होईपर्यंत नोकरीत गुंतून न राहता त्यांना इच्छित कामासाठी स्वेच्छानिवृत्त होता येते. खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तशी कोणतीही तरतूद नव्हती. निवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांना नोकरी करणे भाग होते.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पूर्वी 30 वर्षे नोकरी आणि वयाची 53 वर्षे पूर्ण झाल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तरतूद होती. ही वयाची अट नंतर रद्द करण्यात आली; मात्र त्या सवलतीपासून खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक वंचित होते. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना होती. आता त्यांनाही 20 वर्षांच्या नोकरीनंतर इच्छा असल्यास निवृत्त होता येणार आहे. त्यामुळे खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
----------------
शिक्षक, कर्मचाऱ्यांची संख्या
शाळा ः 1279
तुकड्या ः 1867
शिक्षक ः 9901
अर्धवेळ शिक्षक ः 11
अन्य कर्मचारी ः 411
---------------
खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची सुविधा मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून चालवलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. या विषयाला आधी शिक्षण समितीत आणि आज महासभेत मंजुरी मिळाली. मीसुद्धा शिक्षक असून महापौर म्हणून कारकिर्दीच्या अंतिम दिवशी खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान वाटते.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई