पाच हजारांत "वेटिंग' दूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या तपासणीसाठी असलेली प्रतीक्षा यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाच हजार रुपयांत डावलली जात आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात पाच हजार रुपये देणाऱ्या व्यक्तीला पुढील क्रमांक दिला जात असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई - प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या तपासणीसाठी असलेली प्रतीक्षा यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाच हजार रुपयांत डावलली जात आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात पाच हजार रुपये देणाऱ्या व्यक्तीला पुढील क्रमांक दिला जात असल्याचे उघड झाले आहे. अन्य परिवहन कार्यालयांतही असे लाचखोरीचे प्रकार सुरू असण्याच्या शक्‍यतेने आरटीओच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याचा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक महिन्याची प्रतीक्षा यादी आहे. वडाळा आरटीओ कार्यालयात रिक्षासाठी तीन दिवस आणि इतर वाहनांसाठी 15 दिवस; तसेच अंधेरी आरटीओ कार्यालयात रिक्षासाठी आठ दिवस व इतर वाहनांसाठी 10 दिवसांची प्रतीक्षा यादी आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात वाहनांची तपासणी लवकर करण्यासाठी चार ते पाच हजार रुपये घेतले जातात, असा आरोप आहे. "दिलीप' नावाची व्यक्ती ही वसुली करते; नंतर ही रक्कम अधिकाऱ्यांकडे पोहोचवली जाते, असे सूत्रांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या कामात आरटीओचे अधिकारी व कर्मचारी व्यग्र असल्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात ब्रेक टेस्टिंग ट्रॅक नसल्यामुळे वाहने नवी मुंबईतील ऐरोली आणि नेरूळला पाठवली जातात. दिवसाला 50 पेक्षा जास्त वाहनांची तपासणी करून मंजुरी दिली जाते. 

लाचखोरीचा इन्कार 
ताडदेव आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लाचखोरी होत असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. असे प्रकार होत नसून "दिलीप' नावाच्या कोणालाही ओळखत नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांनी सांगितले. 

आरटीओमध्ये प्रतीक्षा 
ताडदेव : एक महिना 
वडाळा : रिक्षासाठी तीन दिवस, अन्य वाहनांसाठी 15 दिवस 
अंधेरी : रिक्षासाठी आठ दिवस, अन्य वाहनांसाठी 10 दिवस 

Web Title: Waiting list for passenger and logistics vehicles inspection is being done in RTO for Rs. 5000