टिपिकल फिल्मी कथानक वाटेल पण हाफकिनची स्टोरी आहेच तशी

टिपिकल फिल्मी कथानक वाटेल पण हाफकिनची स्टोरी आहेच तशी
Summary

आज कोविडनं धुमाकूळ घातला तसा त्या काळात ‘काॅलरा’ फुल्ल फाॅर्ममध्ये होता. या काॅलरानं जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले हे तो ही बघत होता.

त्याचे वडील मास्टर ‘दिनानाथ’ टाईप आदर्शवादी पर्यायानं गरीब शिक्षक होते. नावाला एक मोठा भाऊ पण तो ही ‘वास्तव’मधल्या मोहनिश बहलप्रमाणं सदैव त्याच्याच आर्थिक विवंचनेत असायचा. त्यात ‘ज्यू’ असल्यानं रशियात अल्पसंख्यांक. त्यामुळं शिष्यवृत्ती नाही,ना रहायला बरी जागा. ‘मोठंही नाही अन् लहानही नाही’ अश्या अडनिड टप्प्यावर म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी कंटाळून त्यानं शेवटी घर सोडलं. आपल्याकडं मुंबादेवी गाठतात तो ‘नोव्होरोसिस्क’साठी रवाना झाला. खिश्यात छदाम नाही,ना अंगावर थंडीपासून बचाव करण्यासाठी धड कपडे. त्या घडीला त्याच्याकडं केवळ दोनच गोष्ट होत्या त्या म्हणजे ‘माॅं का दिया हुआ आशीर्वाद और कुछ कर गुजरनेकी तमन्ना..’मजल दरमजल करत तो एकदाचा पोहोचला अन् त्यानं थेट विद्यापीठ गाठलं. प्राध्यापक मेच्निकोव्ह यांच्या रुपानं त्याला ‘गुरू’ गवसला.

‘जिज्ञासा’ या गुणामुळे तो लवकरच प्राध्यापकांच्या गळ्यातला ताईत झाला. तत्कालिन राजकिय-सामाजिक परिस्थितीत ‘रशियात काम करणं शक्य होईल की नाही?’ याबाबत तो साशंक होताच पण मेच्निकोव्ह देखील त्याच विवंचनेत होते. तो जिनिवा विद्यापीठात शरीरशास्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. रोज सकाळी आरश्यात चेहरा बघतांना तो स्वत:ला ‘हा आपला थांबा नव्हे’ हे वाक्य बजावून सांगायचा. खरं तर त्यावेळी तो जिथपर्यंत पोहोचला होता तेच खूप होतं..प्रामाणिकपणं आपलं काम करणं एवढंच त्याच्या हातात होतं..तो ते करत राहिला. त्याची स्वप्न मोठी असली तरी पुर्वायुष्यातल्या अनुभवामुळं त्याचे पाय जमिनीवर असत त्यामुळं त्याला तशी अपेक्षा नव्हती पण नियती नेहमी वाईटच खेळ खेळते असं नाही. लवकरच त्याला आशेचा किरण दिसला. विख्यात ‘पाश्चर’ संस्थेत एकच पद शिल्लक होतं ते ही ‘ग्रंथपाल’. चंचूप्रवेश म्हणून त्यानं ते पद स्वीकारलं.

आज कोविडनं धुमाकूळ घातला तसा त्या काळात ‘काॅलरा’ फुल्ल फाॅर्ममध्ये होता. या काॅलरानं जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले हे तो ही बघत होता. व्हिलन सापडला होता आता ‘आपणच हिरो आहोत’ एवढंच आपल्याला सिद्ध करायचं आहे याची जाणीव त्याला झाली. पोटात मुरडा-घश्याला कोरड-पाण्यासारखे जुलाब आणि पेशंटचा खेळ खल्लास. मनोमन त्यानं हा खेळच संपवायचं ठरवलं. तो रात्रंदिवस काम करू लागला.

जगभरात या संदर्भात काय चाललंय याचा त्यानं आधी आढावा घेतला. चायना-श्रीलंका-भारतीय किनारपट्टी अश्या अनेक ठिकाणांहून त्यानं काॅलराचे महाभयानक जंतू मागवले. त्याचा गिनिपिगवर प्रयोगही केला. हाती फारसं काही लागत नव्हतं. आजाराचा हॅवाॅक बघता पेशंट आणि स्वयंसेवकही प्रयोगास तयार होत नव्हते शेवटी त्यानं स्वत: बनवलेली लस स्वत:लाच टोचून घेतली,सहा दिवसांनी अजून एक डोस घेतला. दुसऱ्या डोसमध्ये थेट जिवंत जंतू होते.

काय होणार? हे कळणार होतं या इंटरव्हलनंतर. तो ही प्रचंड चिंतित होता पण प्रयोग यशस्वी झाला. आणि ते बघून इतर लोकंही या प्रयोगासाठी तयार झाले. तो चर्चेचा विषय झाला. भरपूर प्रसिद्धी मिळाली संस्थेचे प्रमुख डाॅ.राॅक्स,गुरूवर्य प्रा.मेच्निकोव्ह आणि दस्तूरखुद्द पाश्चर या तिघांनी कौतुकानं त्याची पाठ थोपटली. या दिग्गज लोकांनी ३२ वर्षीय त्याचं कौतुक करावं हा प्रचंड दुर्मिळ योग होता. रशिया-जर्मनी-फ्रान्स सगळीकडं काॅलरानं थैमान घातला होता,थायलँडला त्याहून बिकट परिस्थिती होती तरी सगळीकडं तो पोहोचला.

कलकत्ता बंदरावर पोहोचताच त्यानं काॅलराचं एक वेगळंच भीषण चित्र बघितलं-कश्यामुळं हे झालं असावं हा उलगडाही त्याला झाला. लसीकरणासोबतच इथं शिक्षण-जनजागृती-स्वच्छता या दीर्घकालिन योजनेची आवश्यकता आहे याची त्याला प्रकर्षानं जाणीव झाली. बाकीच्या गोष्टी वेळखाऊ आणि खर्चिक होत्या, त्यानं आधी ‘लसीकरण’ करून घ्यावं असं सुचवलं. पण सहजासहजी मानतील तर ते भारतीय कसले?

कहानीमें ट्विस्ट, इट्स टाईम फाॅर ॲक्शनऽऽऽ

भारतीयांनी सरळ हा प्रस्ताव नाकारला एवढंच नाही तर कोविडच्या प्रारंभी जसे लोकांनी डाॅक्टरांवर हल्ले केले तसं त्याच्यावरही दगडफेक केली. इथंच वेळ होती ‘रिअल हिरोइज्म’ म्हणजे काय ते दाखवण्याची. त्यानं भर पब्लिकमध्ये सोबतच्या एका डाॅक्टरला ‘दे रे मला एक इंजेक्शन’ म्हणून सांगितलं. डाॅक्टर भयचकित झाला पण तो ठाम होता. त्यानं तिथंच इंजेक्शन घेतलं.

नाऊ इट्स टाईम फाॅर इमोशन्स. त्याची ही कृती बघून लोकं स्वत:हून लसीकरणासाठी पुढं आले. इथल्या मृत्यूचं प्रमाण तब्बल ७२%नं कमी झालं.गोष्ट इथंच संपली नाही. एका व्हिलनचा खात्मा झाला होता पण ‘प्लेग’ नावाचा कर्दनकाळ जगभरात अजूनही आपल्या करामती दाखवत होता. शेवटच्या काही दिवसात पाश्चरनं “प्लेगचा इलाज माझाच एखादा विद्यार्थी शोधेल” असं भाकित केलं होतं तद्नंतर अवघ्या दीड वर्षात आपल्या हिरोनं प्लेगची रोगप्रतिबंधक लस शोधली,ती ही आपल्याच मुंबापुरीत. तोपर्यंत प्लेगनं एकट्या चायनात साठ हजार लोकांना यमसदनी पाठवलं होतं. तेव्हा मुंबईतल्या ग्रॅंट मेडिकल काॅलेजच्या आवारातल्या एका खोलीत तो रहायचा. एक शिपाई-एक कारकून-दोन मदतनीस यांच्या मदतीनं त्यानं प्लेगचं आव्हान स्वीकारलं. त्यानं बनवलेल्या लसीची जगभरात मागणी झाली.

टिपिकल फिल्मी कथानक वाटेल पण हाफकिनची स्टोरी आहेच तशी
"ट्विटरवर खेळ खेळण्यापेक्षा कोर्टात पुरावे सादर करा"; क्रांतीने मलिकांना सुनावलं

स्वत:वर अन् प्रयत्नांवर विश्वास ठेवणाऱ्या त्यानं अडचणी-विरोध-मानापमान या सगळ्यांना एक ‘संधी’ म्हणून बघितलं आणि मिळेल त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं. ब्रिटिश सरकारनं त्याला ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ ही उपाधी दिली पण लोकल बाॅडी असलेल्या तत्कालिन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशननं काय करावं? आमसभेत छानपैकी ‘धन्यवाद’ म्हणत एक प्रस्ताव पारित केला. मुंबईतलं काम संपवून तो कलकत्याला गेला आणि तिथंच निवृत्त झाला..निवृत्तीनंतर त्यानं पुन्हा युरोप गाठलं. तिकडं त्याच्या मायदेशात प्रचंड राजकीय-सामाजिक उलथापालथ झाली होती. तो स्वित्झर्लंडमध्ये स्थिरावला.

जंतूंमध्ये रहा-लस बनवा-ती टोचून घ्या-लोकांचा मार खा..”आपल्यासोबत कश्याला कुणाच्या आयुष्याची माती?” म्हणून ‘व्हायोलिन’ या आपल्या जुन्या मैत्रिणीच्या साथीत तो शेवटपर्यंत अविवाहित राहिला. आणि तिथंच त्यानं शेवटचा श्वास घेतला. पण इथंही त्याच्या कथेचा क्लायमॅक्स झाला नाही. त्याची प्रयोगशाळा मुंबईत परेलला आचार्य दोंदे मार्गावर आजही दिमाखात उभी आहे. होय तिच ’हाफकिन इन्स्टिट्यूट’ आणि ‘तो’ म्हणजे

व्लादिमिर हाफकीन. आज हाफकीनचा स्मृतीदिन. समस्त भारतीयांतर्फे खूप खूप साॅरी,अगणित धन्यवाद आणि अगदी कुर्निसात करून अभिवादन.

-डॉ.प्रज्ञावंत देवळेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com