रोज 45 मिनिटे चाला अन् हृदयविकार टाळा!

रोज 45 मिनिटे चाला अन् हृदयविकार टाळा!

घाटकोपर - आपल्या शरीरातील हृदयनामक यंत्राला नेहमी व्यवस्थित कार्यरत ठेवल्यास आपल्याला कोणताच आजार किंवा अटॅक येणार नाही. रोज सकाळी लवकर उठून प्रसन्न वातावरणात आणि शुद्ध हवामानात ४५ मिनिटे चाला अन्‌ हृदयविकार टाळा, असा महत्त्वपूर्ण सल्ला हिंदू सभा रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिल पोतदार यांनी दिला. सशक्त हृदयासाठी ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘आर्ट ऑफ हार्ट’ जनजागृती मोहिमेअंतर्गत मंगळवारी (ता. २३) घाटकोपरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘सकाळ’ आणि एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालयाच्या वतीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हृदयाच्या आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाल्याची एक तरी बातमी रोजच वाचायला मिळते. हृदयासंदर्भात रुग्णाला योग्य मार्गदर्शन नसल्याने अशी वेळ येते. संपूर्ण शरीराचे संतुलन सांभाळणाऱ्या हृदयाची योग्य काळजी आपण घेतली पाहिजे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा आळस हृदयविकाराचा धक्का बसण्यास कारणीभूत ठरतो. ‘आर्ट ऑफ हार्ट’ची मोहीम म्हणजे हृदयरुग्णांना जीवन दाखवणारा उपक्रम आहे, असे डॉ. अनिल पोतदार यांनी सांगितले. 

हृदयाला देहाचे मंदिर म्हटले जाते. कारण, संपूर्ण देह हृदयावर चालते. तरुण पिढी हृदयविकाराचे मूळ लक्षण न समजल्याने मृत्यूच्या दाढेत ओढली जात आहे. ‘सकाळ’चा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. हृदयविकार असलेल्यांना वाचवणारा आहे, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव देवगिरकर यांनी व्यक्त केली. 

रुग्णालयाचे डॉ. रजनीकांत मिश्रा, डॉ. रवींद्र कांबळे, डॉ. श्रुती हळदणकर आदींसह परिचारिका, वॉर्ड बॉय व कर्मचारी मार्गदर्शन शिबिरास उपस्थित होते. 

हृदयविकार कसा टाळावा?
प्रत्येकाने आपल्या वयानुसार व्यायाम करावा. तुम्ही ६० वर्षांचे असाल तर ६० मिनिटे चाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालावे. चालताना अस्वस्थ वाटल्यास लगेच डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी. बाहेरचे खाणे कमी करावे. बसल्या जागी हात-पाय हलवण्याचा व्यायाम करावा. जेवणात तेलाचे प्रमाण कमी करावे, असा सल्ला डॉ. अनिल पोतदार यांनी दिला. हृदयाशी संबंधित काही ध्वनिचित्रफिती दाखवून त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com