वाशीत अंगणवाडीची भिंत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

वाशीतील कोपरी गावातील सेक्‍टर २६ येथील अंगणवाडीची बाहेरील भिंत कोसळण्याची घटना शनिवारी (ता.३) घडली.

नवी मुंबई : वाशीतील कोपरी गावातील सेक्‍टर २६ येथील अंगणवाडीची बाहेरील भिंत कोसळण्याची घटना शनिवारी (ता.३) घडली. मात्र, सात दिवसांपूर्वीच पालिकेने या अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या मुलांची बाजूला असलेल्या मनपाच्या शाळेत पर्यायी व्यवस्था केल्याने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

कोपरी गाव, सेक्‍टर २६ येथे पालिकेच्या इमारतीत एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने बेलापूर मंडळ विभागातर्फे लहान मुलांकरिता अंगणवाडी भरविण्यात येत होती. मागील चार वर्षांपासून ही इमारत अत्यंत धोकादायक परिस्थितीत होती; मात्र या धोकादायक इमारतीत लहान मुले आपला जीव मुठीत धरून शिक्षण घेत होती. स्थानिक नगरसेविका उषाताई भोईर यांनी मुलांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार २० जुलै रोजी अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या मुलांना बाजूच्या पालिका शाळा क्रमांक ३० मध्ये हलवण्यात आले होते.

त्यातच गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या कमकुवत झालेल्या इमारतीची बाह्य भिंत कोसळली; मात्र वेळीच या मुलांची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने कुणालाही इजा झाली नाही. सध्या या इमारतीचा वापर महापालिकेने बंद केला आहे.

या अंगणवाडीची इमारत धोकादायक असल्याने मुलांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली होती. या इमारतीच्या भिंतीचा बाह्य भाग कोसळला; मात्र मी दिलेल्या पत्राची पालिकेने वेळीच दखल घेतल्याने भविष्यात या मुलांसोबत होणारी मोठी दुर्घटना टळली.
- उषाताई भोईर, नगरसेविका, कोपरी गाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wall of the anganwadi collapsed in Vashi