पावसामुळे भिंत कोसळून कुटुंब रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

जव्हार तालुक्‍यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक ठिकाणचे रस्ते, मोऱ्या वाहून गेल्या आहेत; तर अनेक गावांतील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.1) रात्री बाराच्या सुमारास जव्हार तालुक्‍यातील जळविहिरा गावातील रघुनाथ भोये यांच्या घराची भिंत कोसळली.

जव्हार (बातमीदार) ः जव्हार तालुक्‍यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक ठिकाणचे रस्ते, मोऱ्या वाहून गेल्या आहेत; तर अनेक गावांतील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.1) रात्री बाराच्या सुमारास जव्हार तालुक्‍यातील जळविहिरा गावातील रघुनाथ भोये यांच्या घराची भिंत कोसळली. भोये यांच्या घराचा पायाच दबल्याने संपूर्ण घराला तडे गेले आहेत. त्यामुळे घराचे नुकसान झाले असून आता राहायचे कुठे, असा प्रश्‍न भोये कुटुंबासमोर आहे. 

तालुक्‍यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे तालुक्‍यातील अनेक खेड्यात वीज, रस्ते नाहीसे झाले आहेत. वाहतूकही ठप्प आहे. गुरुवारी जयराम भोये यांच्या घराची भिंत कोसळली. रात्री वारा आणि पावसाचा जोर खूप होता. आम्ही सर्व जण घरात झोपेत असताना जोरदार आवाज आला. उठल्यावर घराची भिंत कोसळल्याचे लक्षात आले. घराचा पाया दबला असून संपूर्ण घराला मोठमोठे तडे गेले आहेत, असे भोये यांनी सांगितले. 

भिंतीला ताडपत्रीचा आधार 
पाऊस सतत सुरूच असल्यामुळे पडलेल्या भिंतीला ताडपत्रीचा आधार दिला आहे. कुटुंब वाचले असले, तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंब रस्त्यावर आले असून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे, असे रघुनाथ भाये यांनी सांगितले. दरम्यान, देहेरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गरजे यांनी घराच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी आणि तहसीलदारांना अहवाल देणार असल्याचे सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wall collaps due to heavy rain in Javhar near Mumbai