सिडकोच्या नियोजनाचा ‘कचरा’

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणारी सिडको ‘बडा घर, पोकळ वासा’ असल्याचे  उघड  

मुंबई ः स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणारी सिडको ‘बडा घर, पोकळ वासा’ असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसर जलमय झाला. त्यामध्ये सिडको वसाहत यांचाही समावेश होता; मात्र सिडकोची आपत्कालीन यंत्रणा कुठेच दिसली नाही. या वेळी सिडकोच्या नियोजनाचा बोजवारा उडाला असल्‍याचे दिसून आले. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पालिका स्थापन झाली असली, तरी वसाहतींचे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे वसाहतींची जबाबदारी सिडकोवरच आहे. घनकचरा व्यवस्थापन वगळता सर्व सेवा आजही सिडकोकडे आहेत. स्थानिक रहिवासी सेवाकर सिडकोला देत आहेत; मात्र तरीसुद्धा प्राधिकरणाकडून पायाभूत सुविधा पुरवण्यास हात वर करण्यात आले. गेल्या चार दिवसांत कळंबोलीसह सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मान्सूनपूर्व नालेसफाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

कळंबोली, नवीन पनवेल या ठिकाणी सिडकोचा जलधारण तलाव आहे. शनिवारी नवीन पनवेलचा तलाव ओव्हरफ्लो झाला. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर या तलावातील पाण्याचा पंपाद्वारे उपसा करून ते गाढी नदीच्या पात्रात सोडणे क्रमप्राप्त आहे; परंतु सिडकोचे पंपच बंद असल्याने त्या जलधारण तलावामध्ये नवीन पनवेलमधून येणाऱ्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, माजी नगरसेविका सुनीता घरत, पद्मा भुजबळ यांनी जलधारण तलावातील पंप बंद असल्याचे सिडकोस निदर्शनात आणून दिले. त्यानंतर छोटे पंप लावून या ठिकाणच्या पाण्याचा उपसा करण्यात आला; परंतु पंपाची क्षमता कमी असल्याने फारसा परिणाम झाला नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The waste of cidco planing