वसई-विरारमधील रस्त्यांवर कचऱ्याचा ‘प्रकाश’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

वसई ः वसई-विरार महापालिका परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी दिव्यांनी उजळून निघालेल्या रस्त्यांवर सध्या फटाक्‍यांचे कागद, मिठाईचे रिकामे बॉक्‍स, खाद्यपदार्थाचे वेष्टन आणि अन्य कचऱ्याचा प्रकाश पडला आहे. यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

वसई ः वसई-विरार महापालिका परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी दिव्यांनी उजळून निघालेल्या रस्त्यांवर सध्या फटाक्‍यांचे कागद, मिठाईचे रिकामे बॉक्‍स, खाद्यपदार्थाचे वेष्टन आणि अन्य कचऱ्याचा प्रकाश पडला आहे. यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेत तातडीने साफसफाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

दिवाळीनंतर फटाक्‍यांचे कागद, मिठाईचे रिकामे बॉक्‍स, खाद्यपदार्थांचे वेष्टन यासह अन्य कचरा हा कचराकुंडीत टाकण्यात आला; मात्र यातील बराच कचरा हा रस्त्याच्या कडेला पसरला आहे. महापालिकेतर्फे धूरफवारणी झाली नसल्याने दुर्गंधी पसरत असून माशांचा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असला, तरी कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे शक्‍य होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दिवाळीत सण साजरा करताना अनेक प्रकारचा कचरा शहरात पसरला आहे. सफाई कामगार स्वच्छतेकडे लक्ष देत असले, तरी अनेक ठिकाणी कचरामय परिस्थिती आहे. आचोळे, चंदनासार, वसई, पेल्हार, विरार, नालासोपारा, वालीव, नवघर-माणिकपूरसह बोळिंज या नऊ प्रभागांत  स्वच्छतेसाठी पथनाट्य, बॅनरद्वारे पालिका नागरिकांमध्ये जनजागृती करते; परंतु त्यानंतरही कचरा वाढतच आहे. कचराभूमीवरदेखील डोंगर तयार झाले असून त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तीला याचा त्रास होत आहे. भाजीविक्रेते खराब झालेला भाजीपाला रस्त्यावर टाकत आहेत. भाजीविक्रेते समोरच कुजलेली भाजी टाकत असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waste in Vasai-Virar