पाणीसमस्येवर सांडपाण्याचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

सांडपाणी पुनर्वापर बंधनकारक; गारगाई प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

मुंबई : पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी सुरू असलेले पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेने भर दिला आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर तसेच वर्षा जलसंचयनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा अनुषंगिक कामांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 69 टक्‍क्‍यांनी वाढ करत 1728.85 कोटींची तरतूद केली आहे. त्यामध्ये जल अभियंता खात्यासाठी 582.20; तर पाणीपुरवठा प्रकल्प खात्यासाठी 1146.65 कोटींची तरतूद आहे.

हेही महत्वाचे...या पोराने गुगललाच गंडवले 

पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी पालिकेने गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प विकसित करण्याचे नियोजित केले आहे. गारगाई प्रकल्पातून मुंबई शहरासाठी दररोज 440 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन गतीने व्हावे यावर जोर देण्यात येणार असून प्रकल्पग्रस्तांना आर्थिक भरपाईसह कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार आहे. पुनर्वसनाच्या कामासाठी 119.40 कोटी, तर गारगाई प्रकल्पासाठी 503.51 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

पाण्याची उधळपट्टी कमी होऊन बचत व्हावी, यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शौचालय तसेच इमारतींमध्ये पिण्याव्यतिरिक्त इतर कामकाजासाठी त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणीपुरावठ्यावरील दररोजचा ताण एक हजार 350 दशलक्ष लिटरने कमी होणारा असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच सर्व मलजल प्रक्रिया केंद्रांच्या नवीन निविदांमध्ये, प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 20 टक्के पाणी पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करून देणे संबंधित कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे.

हेही महत्वाचे...नगरसेवकांना "ही' सुविधा हवीच... 

पाणीपुरवठा अखंड आणि सुरळीत सुरू राहावा, यासाठी जलाशयांच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 36.81 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तुळसी जल प्रक्रिया केंद्राच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी 6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामे नियोजित असून त्यासाठी अर्थसंकल्पात 354.99 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. 

रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक 
मोठ्या योजनांमधील इमारतींच्या आराखड्यास मान्यता देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग व मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी पूर्तता करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करामध्ये 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. जल संचयन व मलजलाचा प्रक्रिया करून पुनर्वापर करून पाण्याची प्रतिदिन दरडोई 135 लिटरची मागणी 90 लिटरपर्यंत खाली आणण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 

------------------------------------ 
जलवहन बोगद्यांची कामे प्रगतिपथावर 
*चेंबूर ते वडाळा आणि पुढे परळपर्यंत (9.70 किमी) 
*अमर महल ते ट्रॉबे जलाशयापर्यंत (5.50 किमी) 
*पवई ते वेरावली आणि पवई ते घाटकोपर (6.60 किमी) 
*बाळकूम- ठाणे ते मुलुंड (7.00 किमी) 
(या जलवहन बोगद्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात 170.79 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wastewater recycling binding; Emphasis on completing the Gargai project