कुत्र्याच्या पिल्लाला कोमात जाईपर्यंत मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

"बॉम्बे ऍनिमल राईट्‌स'ची वरळी पोलिस ठाण्यात तक्रार, दोघांना अटक 

मुंबई: इमारतीत शिरलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला सुरक्षा रक्षकाने अमानुष मारहाण केल्याने, बॉम्बे ऍनिमल राईट्‌सने या संदर्भात वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वरळी पोलिसांनी दोन्ही सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

वरळी येथील नेहरू तारांगणजवळ एका इमारतीच्या जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव या सुरक्षा रक्षकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला काठीने अमानुष मारहाण केली. दरम्यान, एका व्यक्तीने मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले आणि ते बॉम्बे ऍनिमल राईट्‌सचे संस्थापक विजय मोहानी यांना पाठवले. त्यानंतर विजय मोहानी यांनी व्हिडीओची दखल घेत 24 जुलैला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, जखमी कुत्र्याच्या पिल्लाला महालक्ष्मी येथील क्राऊन वेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ते 1 वर्षाचे पिल्लू कोमात आहे. सुरक्षा रक्षकांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांना दिली; मात्र वरळी पोलिसांनी जैस्वाल आणि यादव या दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watchman abusing dogs puppies in mumbai

टॅग्स