तुर्भेकरांसाठी वॉटर एटीएम 

तुर्भेकरांसाठी वॉटर एटीएम 

तुर्भे - महापालिका व बीएएसएफ केमिकल कंपनी यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या "लॅंडमार्क प्रोजेक्‍ट-वॉटर ऍण्ड सॅनिटेशन' या उपक्रमांतर्गत तुर्भेतील रहिवाशांना अवघ्या आठ रुपयांमध्ये 20 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. तुर्भेतील महापालिकेच्या शाळेत हे वॉटर एटीएम बसवले आहे. महापौर जयवंत सुतार व आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या हस्ते आणि बीएएसएफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रमण रामचंद्रन यांच्या उपस्थितीत वॉटर एटीएमचे उद्‌घाटन करण्यात आले. 

बीएएसएफच्या वतीने शहरात "लॅंडमार्क प्रोजेक्‍ट-वॉटर ऍण्ड सॅनिटेशन' या उपक्रमांतर्गत रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि स्मार्टकार्ड आधारित कम्युनिटी वॉटर ट्रीटमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळा क्रमांक 22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात हे वॉटर एटीएम बसवण्यात आले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने पावसाचे पाणी साठवून त्यावर बीएएसएफच्या अल्ट्रा फिल्टरेशन सोल्युशनसारख्या आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने जलशुद्धीकरण केल्यावर ते एटीएममध्ये सोडले जाणार आहे. एटीएममधून पाणी काढण्यासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध केली आहे. डेबिट कार्डनेही एटीएममधून पाणी घेता येणार आहे. यातून मिळणारे पैसे रेन वॉटर हार्वेस्टिंग व मशीनच्या देखभाल व दुरुस्तीसाठी वापरले जाणार आहेत. बीएएसएफकडून दोन वर्षांसाठी हा प्रकल्प राबवला जाणार असून त्यानंतर स्वयंसेवी संस्थेकडे तो हस्तांतरित केला जाणार आहे. नंतर या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संस्थेवर राहणार आहे. यामुळे नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात तुर्भे स्टोअरमधील रहिवाशांना मुबलक शुद्ध पाणी मिळेल, असे महापौर जयंवत सुतार यांनी सांगितले. 

बीएएसएफ या केमिकल कंपनीच्या स्थापनेला 150 वर्षे झाल्यानिमित्त महापालिकेसोबत हा उपक्रम सुरू केला आहे. वॉटर लाईफ इंडियाने वॉटर एटीएम आरेखित व विकसित केली आहे. बीएएसएफचे अल्ट्रा फिल्टरेशन तंत्रज्ञान वापरून 10 वर्षे चालवली जाणार आहे. पर्यावरणातील अभियांत्रिकी तज्ज्ञसेवा "स्टेप' संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्तीचे काम पाहिले जाणार आहे. 

स्वच्छ पाणी व सांडपाणी नियोजन सुविधा पुरविण्याकरिता नाविन्यपूर्ण रसायनशास्त्र सोप्या आणि किफायतशीर तंत्रज्ञानाचा कसा अवलंब करून आणू शकतो, याचे हा प्रकल्प उत्तम उदाहरण आहे. बीएएसएफसारख्या कंपन्यांनी पुढाकार घेऊन तो राबवल्यामुळे इतर कंपन्यांना प्रेरणा मिळेल. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त 

पिण्याचे स्वच्छ पाणी खरेदी करण्यासाठी झोपडीतील नागरिकांना उत्पन्नाच्या 15 टक्के खर्च येऊ शकतो. मात्र बीएएसएफ व महापालिकेच्या पुढाकाराने त्यांना माफक दरात चांगल्या दर्जाचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. 
- डॉ. रमन रामचंद्रन, अध्यक्ष, बीएएसएफ इंडिया 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com