मुंबईतील सागरी प्रजातींवर आंतरराष्ट्रीय मोहर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

मुंबईत आढळणाऱ्या सागरी प्रजाती 
गिरगाव चौपाटी - समुद्री फूल, खेकडे, शंख-शिंपले, डेकोरेटर वॉर्म (गांडुळांच्या प्रजाती) 
जुहू चौपाटी - प्रवाळ, खेकडे, शंख-शिंपले, समुद्रफूल, समुद्रीगोगलगाय, स्पोन्ज
हाजी अली - प्रवाळ, समुद्री गोगलगाय, स्पोन्ज, समुद्री शेवाळ.

३३८ जलचर प्रजातींना ‘आय नॅचरलिस्ट’ संकेतस्थळाची मान्यता
मुंबई - प्रदूषणामुळे मरणासन्न झालेल्या मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील ३३८ प्रजातींच्या जलचरांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ‘आय नॅचरलिस्ट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकेतस्थळाने ही मोहर उमटवली आहे.

‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’ ही संस्था मुंबईतील किनाऱ्यांवरील जलचर सृष्टीचा अभ्यास करते. दोन वर्षांच्या अभ्यासात या संस्थेला दोन हजारपेक्षा अधिक  जलचर आढळले होते. याबाबतची माहिती त्यांनी आय नॅचरलिस्ट संकेतस्थळाकडे पाठवली. त्यानुसार संकेतस्थळाच्या तज्ज्ञांनी अभ्यास करून त्यातील ३३८ प्रजातींना मान्यता दिली आहे.  

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी मरिन लाईफ ऑफ मुंबई हा गट संशोधन करतो. यांसह जनजागृती व संवर्धनासाठी महिन्यातून एकदा हा गट नागरिकांना विविध चौपाट्यांवरील जैवविविधतेची भेट घडवून देतो. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, हाजी अली, वांद्रे कार्टर रोड आणि बॅण्ड स्टॅण्ड या भागांतील समुद्री जैवविविधतेची माहिती दिली जाते. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये ‘बोंबीयाना’ ही समुद्री गोगलगाईची प्रजाती मरिन लाईफच्या सदस्यांना आढळली. यापूर्वी १९४६ मध्ये ही प्रजाती आढळली होती, असे मरिन लाईफचे प्रदीप पाताडे यांनी सांगितले.

प्लास्टिक आणि सांडपाण्यामुळे जलप्रदूषणाची मोठी समस्या असतानाही समुद्री जीव टिकून असल्याचे समाधान आहे. 
- प्रदीप पाताडे, मरिन लाईफ ऑफ मुंबई

आय नॅचरलिस्ट...
नॅचरल जिओग्राफी सोसायटी आणि कॅलिफोर्निया ॲकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेचे ‘आय नॅचरलिस्ट’ या विज्ञान संकेतस्थळाला पाठबळ आहे. या संकेतस्थळावर जगभरातील सजीव सृष्टीची छायाचित्रे अपलोड केली जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water borne species Mumbai Sea International recognition