पाण्यासाठी जीवही पणाला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

कुंडाचा पाड्यातील विहिरीवर आदिवासींची कसरत 

मोखाडा - मोलमजुरीऐवजी केवळ पाण्यासाठी धावाधाव करणे, हा एकमेव दिनक्रम जव्हारमधील कुंडाचा पाडा येथील आदिवासींचा बनला आहे. "माणसी वीस लिटर पाणी' या सरकारी नियमाचा फटका बसत असल्याने या आदिवासींना पाण्याचा टॅंकर येताच विहिरीवर जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे संपूर्ण विहिरीला घेराव घालून, विहिरीच्या कठड्यावर चढून, एकमेकांना धक्के देत या आदिवासी महिला पाण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावत आहेत. 

जव्हार-नाशिक रस्त्यालगत असलेल्या कुंडाचा पाडा या गावात मोठी विहीर असूनही सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. या विहिरीचे पाणी मार्चनंतर संपत असल्यामुळे राज्य सरकार दरवर्षी येथे टॅंकरने पाणीपुरवठा करते. ज्या वेळी या वाडीत टॅंकर येतो, तेव्हा शेकडो महिला डोक्‍यावर-खांद्यावर हंडा, कळशी, बादली घेऊन जीवाच्या आकांताने पाणी भरण्यासाठी विहिरीवर गर्दी करतात. या आदिवासी महिलांची ही पाण्यासाठीची रोजचीच कसरत असते. विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे प्रति माणसी 20 लिटर पाणी दिले जात असल्याने जादा पाण्यासाठी या महिला विहिरीच्या कठड्यावर उभ्या राहून जीवघेणी स्पर्धा करतात. त्यामुळे जर एखाद्या महिलेचा तोल गेला किंवा चक्कर आली तर एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशी भीती हे आदिवासी व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, तालुक्‍यातील कौलाळे, श्रीरामपूर व कासटवाडी गावठाणात; तर जांभळीचा माळ, खरंबा, कुंडाचा पाडा व पिंपळपाडा या सात गाव-पाड्यात सध्या दोन टॅंकरने दररोज एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. तसेच आपटाळे, कापरीचा पाडा, मोरगिळा, शिवाकोरड्याची मेट, मोगरावाडी या पाच नवीन गाव-पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

Web Title: water crisis in mokhada