खारघरमधील पाणीप्रश्न पेटला; सिडको भवनावर आंदोलन करण्याचा नागरिकांनी दिला इशारा

खारघरमधील पाणीप्रश्न पेटला; सिडको भवनावर आंदोलन करण्याचा नागरिकांनी दिला इशारा

गेल्या कित्येक महिन्यांपासून खारघरवासीय पाणीटंचाईने त्रस्त आहे. सिडकोच्या हेटवणे धरणावरुन येणाऱ्या हमरापूर जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खारघरवासीयांची पाणी समस्या दूर होईल असं आश्वासन सिडकोने नागरिकांना दिलं होतं. मात्र, जलवाहिन्यांचं काम पूर्ण झाल्यानंतरही येथील नागरिकांची पाणी समस्या काही केल्या कमी व्हायचं नाव नाही. त्यामुळे आता पाणी समस्येच्या विरोधात लवकरच येथील नागरिक आंदोलन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खारघर शहराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखापेक्षा अधिक आहे. त्यात खारघर परिसरात गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. खारघरला जवळपास सत्तर एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ पंचावन्न एमएलडी पाणी उपल्बध होत आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या विरोधात गेल्या पाच वर्षांपासून खारघर मधील राजकीय पक्ष,विविध सामाजिक संघटना आणि रहिवासीयांनी सिडको भवन आणि खारघरच्या सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पत्र, निवेदने दिली.

दरम्यान , हेटवणे धरणातून खारघमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पेण येथील हमरापूर येथे सुरु आहे. हमरापूरमधील डोंगर फोडून तेथे मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात नवी मुंबई महापालिकेकडून नागरिकांना पाच एमएलडी पाणी साठी पुरवला जाईल, असं आश्वासन सिडकोने नागरिकांना दिलं होतं. परंतु, त्यानंतर २५ मार्च रोजी सिडकोने जलवाहिनी दुरुस्तीसाठी खारघरमधील चोवीस तास पाणी पाणी पुरवठा बंद ठेवून बाराशे मीटरच्या जुन्या जलवाहिनीच्या जागी पंधराशे व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले. मात्र मोठी व्यासाची जलवाहिनी जोडूनही खारघर मधील पाणी समस्या अजूनही जैसे थे आहे. सिडकोकडून ज्या सोसायटीत पाणी पुरवठा होत नाही अशा सोसायटीने सिडकोकडे तक्रार केल्यास पाणी टँकरने पाणी पुरवठा उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले जाते.मात्र खारघर परिसरात काम करणारे सिडकोचे कर्मचारी फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांना विकत पाणी घेवून गरजा पूर्ण कराव्या लागत आहे.

६ एप्रिलला  करणार आंदोलन

खारघर सेक्टर २६  ते ३६ परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. हेटवणे धरणाच्या जलवाहनी दुरुस्तीनंतर खारघरमध्ये १० एमएलडी अधिक पाणी साठा उपलब्ध होणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले होते. मात्र परिस्थिती जैसे थे असल्यामुळे खारघर तळोजा वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ६ एप्रिलला सिडको भवन वर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खारघर,तळोजामध्ये मध्ये काही नागरिकांनी स्वतंत्र्य विहीर,बोअरवेल मारून लाखो रुपये खर्च करून सदर पाणी शुद्धीकरण करून व्यवसाय थाटला आहे. वीस लिटरची बॉटल तीस ते चाळीस रुपयात घरपोच सेवा उपलब्ध पुरवठा केला जातो.मात्र खारघर मध्ये गेल्या काही महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवासीयांनी दिवसांचे शंभर रुपये खर्च करून बाहेरून पाणी विकत घेवून गरजा पूर्ण करीत आहे. दुकानदार बरोबर नागरिकही पाणी खरेदी करीत असल्यामुळे पाणी विक्रेत्याचा व्यवसाय जोरात सुरु आहे.

भागात पाणी पुरवठा होत असलेल्या जुनी बाराशे व्यासाची जलवाहिनीच्या जागी नवीन पंधराशे व्यासाची जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. जोडणी केल्यावर जास्त दाबाने पुरवठा केल्यास जलवाहिनीला धोका पोहचू शकतो म्हणून पूर्वीपेक्षा रोज हळूहळू जास्त प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच रोज पाणी वाढ होत आहे. जलवाहिनीला धोका पोहचू नये म्हणून काही तज्ज्ञ व्यक्तींसोबत पाहणी करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात नागरिकांना पुरेसा पाणी मिळेल, असं सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र दहयातकर यांनी सांगितलं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com