पाणीप्रश्‍न पेटणार! 

पाणीप्रश्‍न पेटणार! 

नवी मुंबई - पनवेल महापालिकेला पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेच्या पटलावर आला आहे. ऐन निवडणुकीत पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पटलावर आणल्याने त्यावरून राजकारण रंगण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबईत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला तर पनवेल महापालिका निवडणुकीत त्याचा प्रचारासाठी वापर करण्याची आयती संधी शेकाप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार आहे. हा पाण्याचा मुद्दा असल्याने नवी मुंबईत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपला त्याला विरोधही करता येणार नाही. त्यामुळे पनवेलच्या पाण्यावरून त्यांची कोंडी होणार आहे. 

पनवेल महापालिकेचे मालकीचे धरण असूनही त्यात गाळ साचल्याने शहराला पाणी पुरत नाही. त्यामुळे पनवेल शहराला महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ व काही भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतरही शहराला पाच एमएलडी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे शेजारच्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून पनवेलला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिकेने नवी मुंबई महापालिकेकडे पाठवला होता. तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी आलेले एन. रामास्वामी नियोजित सुट्टीवर गेल्याने काही दिवसांसाठी पनवेलचे आयुक्त डॉ. राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे नवी मुंबईचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. त्याचा फायदा घेत निंबाळकर यांनी महासभेची परवानगी न घेता स्वतःच्या अधिकारात पनवेलला पाणीपुरवठा करण्याचा थेट आदेश नवी मुंबईच्या पाणीपुरवठा विभागाला दिला होता; परंतु विश्‍वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे सांगून लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला होता. निंबाळकरांच्या आदेशानंतरही पनवेलला पाणीपुरवठा करण्याबाबत नळजोडणीचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने अभियांत्रिकी विभागाने पाणीपुरवठा सुरू केला नव्हता; परंतु आता प्रशासनाने पनवेलला सुकापूरजवळ 150 मिमी व्यासाची नळजोडणी करून एप्रिल ते 15 जून अखेरपर्यंत पाच एमएलडी पाणी नऊ रुपये प्रतिहजार लिटर दराने देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात सुकापूरजवळ बसवण्यात येणाऱ्या नळजोडणीच्या खर्चाचा बोजा पनवेल महापालिकेवर टाकला आहे. महापालिकेने फक्त पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी उचलली असून त्याबदल्यात 24 तास ठराविक दबावाने पाणीपुरवठा करण्याची तरतूद केली आहे. पाणीपुरवठा करण्याचा हा प्रस्ताव ऐन निवडणुकीत आल्याने यावरून राजकारण सुरू होण्याची शक्‍यता आहे. पनवेलमध्ये असलेल्या समस्यांच्या व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची जमेची बाजू प्रचारात मांडण्याची नामी संधी यामुळे शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळणार आहे; तर पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न असल्याने शिवसेना-भाजपला या प्रस्तावाला विरोध करता येणार नाही. 

पनवेल शहराची तहान भागवण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत. मात्र पनवेलची तहान भागवण्याकरिता आम्ही नवी मुंबई महापालिकेकडे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आता तो पटलावर आला असल्यास आम्ही त्याचे स्वागतच करतो. 
- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, पनवेल महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com