पाणीप्रश्‍नावरून खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मुंबई - पाणीटंचाईमुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. तीन महिने होऊनही पुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक होत बुधवारी स्थायी समिती दणाणून सोडली आणि सभागृहातच ठिय्या मांडला. पाणीप्रश्‍न सोडवण्याचे प्रशासनाने आश्‍वासन दिले; मात्र चार दिवसांत पाणीप्रश्‍न सुटला नाही, तर प्रत्येक वॉर्डात तीव्र आंदोलन करू, असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिला. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील साठा कमी असल्याचे सांगत प्रशासनाने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली आहे; मात्र मुंबईत अनेक भागात विशेषतः डोंगरावरील वसाहतीतील रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागते आहे. यावर नगरसेवकांकडून सातत्याने सभागृहात आवाज उठवला जात असतानाही पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासनाची उदासिनता आहे.

यावर स्थायी समितीत बुधवारी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. पाणीप्रश्‍न सुटेपर्यंत सभागृहातच ठिय्या मांडण्याचा इशारा भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेला बहुतांशी नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. काही विभागात पाण्याची समस्या सुटत नसून टॅंकरही मिळेनासे झाले आहेत. पाण्याच्या वेळा बदलल्या तरी उपयोग झालेला नाही. कधी कधी पाणी अवघ्या १५ मिनिटांसाठी येते. वेळा बदलल्यामुळे पाण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांना रात्रभर जागावे लागते, पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसल्यावर त्या दिवशी दुसऱ्या विभागातील पाणी बंद करून सोडले जाते. अशी बनवाबनवी प्रशासनाची सुरू आहे, असा आरोप करत अभिजित सामंत यांनी सभागृहातच ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला; मात्र प्रशासनाने आश्‍वासन दिल्याने त्यांनी तूर्तास माघार घेतली.

पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पाणीपुरवठ्याचा ‘मायक्रो प्लॅन’ पालिकेने तयार केला आहे. यात दोन टप्प्यांत काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात जलवाहिनीची दुरुस्ती व इतर छोटी कामे केली जातील. दुसऱ्या टप्प्यात गळती रोखणे, नागरिकांच्या सूचना आणि तक्रारीनुसार टंचाईवर मात करण्यासाठी, पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. 
- अशोककुमार तवाडिया, मुख्य जलअभियंता.

Web Title: Water Issue Corporator